मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम येथील प्रशासकीय इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद वायाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे होते. यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अरुण खोत, विवाह समुपदेशक डॉ. एस. जी. पांडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहीणी ढवळे, वनक्षेत्रपाल शितल राठोड उपस्थित होते.
मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आता प्रत्येक पालकांची आहे. पालकांनी आपल्या घरातूनच आपल्या मुलांना मराठी भाषेची आवड निर्माण करावी. त्यामुळे भविष्यातील पिढी ही मराठी भाषेचे संवर्धन करु शकेल, असे न्यायाधीश वायाळ आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रमुख पाहुणे युवराज पाटील यांनी मराठी भाषेचा इतिहास मांडून, मराठी भाषेची उत्पत्ती, पौराणिक वास्तु, मंदिरे यांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय केले पाहिजे याची विस्तृत माहिती दिली. तर कौटुंबिक न्यायालयाचे डॉ. एस.जी. पांडे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे ज्यामुळे मुलांचा विकास योग्य तऱ्हेने होईल, असे सांगितले. यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रोहीणी ढवळे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी समाजाची भूमिका महत्वाची असल्याचे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी तसेच कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी वर्ग, न्यायालयातील पक्षकार हजर होते. कार्यक्रमाचे संचालन व आभा श्रीमती रोहिणी इनामदान यांनी केले.