सहकारातूनच महिला बचत गटांची संकल्पना पुढे आली असून राज्यातील अनेक महिला बचगटांचे आदर्श काम होत असून महिला बचत गटांच्या आर्थिक व्यवहारामुळेच राज्याचा आर्थिक स्त्रोत वाढण्यात मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मानिनी जत्रेचे आयोजन येथील जिल्हा परिषदेच्या मैदनावर करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे वितरण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटनप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालक्याण सभापती सोनाली पोळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात 8 हजार महिला बचत गटांमध्ये एकूण 84 हजार महिला बचत गट जबाबदारीने काम करीत असून त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला मानिनी जत्रेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे व्यासपीठ जिल्हा परिषद उपलब्ध करुन देत आहे. बचत गटांचा आर्थिक स्त्रोत वाढण्यासाठी त्यांना लागणाऱ्या यंत्रांच्या किंमती जास्त असल्याने बचत गटांना यंत्रे वैशिष्ठयपूर्ण योजनेतून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्य शासन हे सर्वसामान्यांना दिलासा व बळ देण्याचे काम करीत आहे महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी जे जे करणे शक्य होईल ते केले जाईल, असे आश्वासनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत 840 कोटी कर्ज 13 हजार लाभार्थ्यांना वाटप केले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 826 लाभार्थी असून त्यांना 60 कोटी 61 लाख रुपये उद्योग उभारणीसाठी दिले आहे. महिला बचत गटांना मोठा उद्योग उभारणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. हे कर्ज बीनव्याजी असून कर्जाची हमी राज्य शासन घेत आहे. महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व्हावी यासाठी मानिनी जत्रेमध्ये स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलला जास्तीत जास्त महिला बचत गटांनी भेट द्यावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
बचत गटांच्या उत्पादीत केलेल्या मालाला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत मानिनी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बचत गटांच्या कुटुंबांना आर्थिक व सामाजिक सक्षम करण्यासाठी मानिनी जत्रा संजीवनी ठरत आहे. जिल्ह्यात 8 हजाराहून अधिक महिला बचत गट असून या महिला बचत गटांचे भविष्य उज्वल आहे. बचत गटांमधील महिलांनी अधिक क्रियाशील राहण्यासाठी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. तसेच महिला बचत गटांच्या उन्नतीसाठी शासनाने सर्व ती मदत करावी, अशी अपेक्षाही जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात 8 हजार महिला बचत गट कार्यरत असून त्यांना सहकार्य करण्यासाठी 16 ग्रामसंघांची स्थापना करण्यात आली आहे. सन 19-20 मध्ये बचत गटांना 35 कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. तसेच अस्मिता योजनेचा जिल्ह्यातील 50 हजार महिलांनी लाभ घेतला असून मानिनी जत्रा प्लास्टीकमुक्त करण्यात आली असून या जत्रेचा जास्तीत जास्त सातारा जिल्हावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले.
या वेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिला बचत गटांतील महिलांचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.