माणदेशी फौंडेशनच्यावतीने जिल्हा परिषद मैदानावर भरवण्यात आलेल्या माणदेशी महोत्सव 2019’ ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच दिवसांत 232 स्टॉल्सवर ग्राहकांची झुंबड उडाली होती. या महोत्सवात सबकुछ’ एकाच ठिकाणी मिळत असल्याने गर्दीचा उच्चांक होऊन लाखो रुपयांची उलाढाल झाली.
माणदेशी फौंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष श्रीमती चेतना सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्रीमती वनिता शिंदे व सहकारी महिला सबलीकरणासाठी गेल्या काही वर्षांपासून माणदेशी महोत्सवाचे आयोजन करत आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या माणदेशी महोत्सवात 232 स्टॉल्सवर ग्राहकांची गर्दी झाली होती. महोत्सवात बारा बलुतेदारांचे 16, शेतीविषयक 19, मसाल्याच्या पदार्थांचे दहा, आवळा कँडीचे चार, कापडी पिशव्यांचे सात, जेन विक्रीचे पाच, कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाचे चार, मशिनरीचे 23, गूळ, काकवीचे चार आणि इतर 110 स्टॉल्स लावण्यात आले होते. गृहोपयोगी वस्तू, आधुनिक मशिन्स, घरघंटी, सोलर, शेती अवजारे उपलब्ध असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून नागरिकांनी महोत्सवाला भेट दिली.
सातारा, पुणे, चिपळूण, नाशिक या राज्यातील जिल्ह्यांसह सिल्व्हासा (गुजरात), हुबळी (कर्नाटक) येथील व्यावसायिकांनीही या महोत्सवात स्टॉल्स लावले होते. महोत्सवात शाकाहारी, मांसाहारी जेवणाबरोबर नाश्ता, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीमचे स्टॉलही होते. या महोत्सवामध्ये चार दिवसांत गर्दीचा उच्चांक आणि लाखो रुपयांची उलाढाल झाली.