उपाध्यक्ष शेंडे यांच्या पुढाकाराने खेड – पिरवाडी येथील २० डंपर कचरा काढल्याने परिसर बनला चकाचक

73
Adv

खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जो भाग सातारा शहरात समाविष्ट झाला आहे असा महामार्गालगतच्या पिरवाडी ते वेण्णा नदीपर्यंतच्या परिसरात सातारा पालिकेच्या वतीने धडक स्वच्छता मोहिम राबवण्यात आली . खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांच्या पुढाकाराने झालेल्या सफाई मोहिमेत वीस डंपर कचरा काढण्यात आला .

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात पायाभूत सुविधा देण्यासाठी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या पुढाकारातून सातारा पालिकेने आता प्रत्यक्ष हालचाली सुरू केल्या आहेत . पिरवाडीसह खेड ग्रामपंचायतीच्या दोन वॉर्डातील साधारण साडेपाच हजार लोकसंख्या शहरात समाविष्ट झाली आहे . या भागात घंटागाडीचे सातत्य नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते . उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी वीस सफाई कामगार व दोन डंपर कामाला लावून पिरवाडी -सदर बझार कॅनॉल- म्हाडा कॉलनी – मानस प्राईड हॉटेलची समोरची बाजू ते थेट वेण्णा नदीपर्यंतचा सर्व परिसर चकाचक केला .

पालिकेची या भागात गेल्या काही दिवसापासून मोहिम सुरूच आहे पण उपनगराध्यक्ष शेंडे जेव्हा स्वतः कामगारांसह या मोहिमेत उतरले तेव्हा तब्बल वीस डंपर कचरा यावेळी गोळा करण्यात आला . या भागासाठी लवकरच घंटागाड्या सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी दिले .याशिवाय अन्य सुविधा संदर्भातही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याशी चर्चा करून त्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मनोज शेंडे यांनी स्पष्ट केले .

Adv