कर्मचारी बदलीसंदर्भात तक्रार समिती गठीत

53
Adv

सातारा जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा परिषद स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या काही तक्रार असल्यास त्याबाबतचे अर्ज संबंधित विभागास सादर करावेत त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व कर्मचारी संघटनांना देण्यात आले.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दि. २ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत विभागात बैठक झाली. बैठकीस सुशांत मोरे, जि.प. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, डॉ. राजू कदम, प्रशासन अधिकारी नितीन दिक्षीत उपस्थित होते.

बैठकीत अर्चना वाघमळे यांनी प्रशासकीय, विनंती, आपसी बदलीबाबतची कार्यवाही सांगितली.त्यावेळी सुशांत मोरे व काका पाटील यांनी विविध मुद्दे उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पदांचा समतोल साधणे आवश्यक असल्याने प्रशासकीय दृष्ट्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया संबंधित विभाग प्रमुख यांच्याशी समन्वय साधून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना समक्ष बोलावून समुपदेशन प्रक्रियेने राबविण्यात आलेली आहे. बदली प्रक्रियेसंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी करण्याच्या सूचना अर्चना वाघमळे यांनी दिल्या. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा परिषद स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. आलेल्या तक्रार अर्जावर समिती निर्णय घेईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत त्या निदर्शनास आणून दिल्या त्याचे निराकरण केले जाईल असे आश्वासनही अर्चना वाघमळे यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.
आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाबरोबर बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत ज्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय, विनंतीबदलीबाबत अन्याय झाला आहे त्यांनी समितीकडे अर्ज द्यावेत त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन अर्चना वाघमळे यांनी दिले. घटस्फोट घेतलेल्या शिक्षकांचे सेवा पुस्तकात नोंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिले असल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.

Adv