जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणात येणार !..आ गोरे

845
Adv

आयोध्देत प्रभु श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्याच क्षणी जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणातून आंधळी बोगद्यात सोडण्यात येईल. माझ्यासह चातकासारखी पाण्याची वाट पहाणाऱ्या माणमधील जनतेसाठी हा सुवर्णक्षण आहे. आज रात्रीपर्यंत हे पाणी आंधळी धरणात पोहचणार आहे. या पाण्याचे पूजन १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार.
खटाव तालुक्यातील नेर धरणात जिहेकठापूर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे माण तालुक्यात नेण्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना आ. गोरे म्हणाले, देशातील रामभक्तांच्या ५०० वर्षांच्या अथक संघर्षानंतर आज आयोध्देतील प्रशस्त मंदीरात प्रभु रामचंद्र विराजमान होत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या क्षणी प्रभू रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करतील त्याच क्षणी जिहेकठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील नेर धरणातून आंधळी बोगद्यात सोडण्यात येणार आहे. हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. चातकासारखी पाण्याची वाट पहाणाऱ्या माणमधील जनतेसाठी हा परमोच्च आनंदाचा सुवर्णक्षण आहे. उरमोडी, तारळी योजनांचे पाणी आणून आपण ९७ गावांमध्ये सिंचनसुविधा निर्माण केली. गेली १० वर्षे उरमोडीचे पाणी मतदारसंघात येत आहे. नदीच्या उत्तर बाजूला असणारी गावे जिहेकठापूरच्या पाण्याची वाट पहात होती. या योजनेला मी आमदार झाल्यापासून अधिकाधिक निधी मिळवला. एका नलिकेचे काम होवून हे पाणी आज माण तालुक्यातील आंधळी धरणात येत आहे. या योजनेचे नामकरण पंतप्रधान मोदींचे गुरु खटावचे स्व. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजना असे करण्यात आले. पंतप्रधानांनी या योजनेचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करुन लागणारा निधीही दिला. गुरुंच्या नावे असलेल्या योजनेच्या पाण्याचे पूजन करायला मोदीही उत्सुक आहेत. १९ फेब्रुवारीला त्यांच्या हस्ते आंधळी धरणात पाणीपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माणगंगा नदीतून हे पाणी देवापूरपर्यंत जाणार आहे. उत्तर माणमधील ३२ गावांसाठी वाढीव जिहेकठापूर योजनेचे काम वेगाने सुरु आहे. या योजनेचे पाणी हिंगणीपर्यंत नेणार आहे. पांगरी, बिजवडी,शिंगणापूर ते डोंगराच्या वरचा पट्टा या योजनेत समाविष्ट नव्हता. त्यासाठी पाण्याचे फेरवाटप करुन सव्वा टीएमसी पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या गावांसाठी सातशे कोटींच्या योजनेला लवकरच मान्यता मिळणार आहे. आणखीही काही जिहेकठापूरच्या पाण्यापासून वंचित रहात आहेत. त्या गावांचे सर्वेक्षण करुन प्रत्येक गावाला पाणी देण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. माण आणि खटावमधील ४४ गावांसाठी टेंभू योजनेतून पाणी देण्याची विस्तारीत योजना मंजूर होवून टेंडर प्रक्रियेपर्यंत आली आहे.

वाढीव सव्वा टीएमसी पाणी लाभदायक ठरणार ……
उरमोडीचे पाणी कण्हेर कारव्यातून आणताना खूप पाणी वाया जात होते. मी ते पाणी कोंबडवाडीपर्यंत पाईपलाईनद्वारे आणण्याचे फडणवीस यांना सुचवले आणि प्रस्ताव सादर केला. ७५० कोटी खर्चून हे पाणी आता पाईपलाईनद्वारे येणार असल्याने सव्वा टीएमसी पाणी वाचणार आहे. ते वाचलेले पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना लागेल तेव्हा पाणी आणता येणार आहे. जिहेकठापूरचे पाणी आल्याने उरमोडीच्या पाण्यावर नदीकाठच्या गावांचा पडणारा बोजा कमी होणार आहे.

सुवर्णक्षणाचा योग स्वप्नपूर्तीचा आनंद देणारा ……
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा देशावासियांसाठी जसा सुवर्णक्षण आहे तसा आमच्यासाठी जिहेकठापूरचे पाणी आंधळी बोगद्यात येण्याचा क्षण स्वप्नपूर्तीचा आहे. पाणीयोजनांची कामे करण्यासाठी आम्ही निरंतर आणि खडतर प्रयत्न करत आलो आहोत. त्या प्रयत्नांना यश आले आहे. आणखी उर्वरित कामे करण्यासाठीही माझे वेगवान प्रयत्न सुरु आहेत.

Adv