पुढली वर्षी जनता सहकारी बॅंके लाभांश देणार चेअरमन अतुल जाधव

88
Adv

सातारा तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेने दोनदा तोटा भरुन काढून बँकेला सुस्थितीत आणण्याचे काम भागधारक पॅनेलने केले आहे. यावर्षी वसुली चांगली झाली असून येत्या वर्षात आणखी जोमाने वसुली करुन पुढील वर्षी बँक सभासदांना लाभांश वाटप करणार असल्याची ग्वाही बँकेचे चेअरमन अतुल जाधव यांनी दिली.

जनता सहकारी बँकेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे संचालक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. बँकेच्या वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन ज्येष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी केले त्याला उपस्थित सर्व सभासदांनी मंजुरी दिली. बँकेची सभा खेळीमेळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. चेअरमन अतुल जाधव पुढे म्हणाले, जनता बँकेने गेल्या वर्षात तब्बल 8 कोटी रुपयांची थकबाकी वसुल करुन इतिहास रचला आहे. भांडवल पर्याप्तता प्रमाण रिझवर्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार 9 टक्के राखणे आवश्यक असून बँकेने हे प्रमाण 15.51 टक्के राखलेले आहे. चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 20 लाख निव्वळ नफा झालेला आहे. एन.पी.ए. प्रमाणावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने वसुली संदर्भातील सर्व कठोर उपाययोजना करण्याचे धोरण संचालक मंडळाने निश्चित करुन त्याप्रमाणे अंमलबजावणीही सुरु केलेली आहे. त्यांचे चांगले परिणाम या वर्षाअखेर पर्यंत निश्चितच दिसून येतील. त्यामुळे बँकेचा संचित तोटा पूर्ण भरून निघेल व रिझवर्ह बँकेच्या परवानगीने लाभांश जाहीर करण्याच्या स्थितीत बँक येईल. मंदीच्या काळातही बँकेने नोकर भरतीच्या माध्यमातून 75 जणांना रोजगार दिला असून त्यांची कुटुंबे उभी राहण्यासाठी हातभार लावल्याचेही त्यांनी सांगितले.

सभेच्या पूर्वी मतदार जनजागृती कार्यक्रमातंर्गत सहाय्यक उपनिबंधक प्रीती काळे यांनी मतदान करण्यासाठी बँकेच्या अधिकारी, कर्मचारी, सभासदांनी प्रयत्न करावेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. यावेळी त्यांनी शासनाच्यावतीने मतदान केंद्रावर देण्यात येणा-या सुविधांची माहिती दिली तसेच उपस्थित सर्वांना मतदान करणारच अशी प्रतिज्ञा दिली. तसेच सभासद प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत सहकार शिक्षणाधिकारी आर.टी. सुरवसे यांनी 97 व्या घटनादुरुस्तीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी क्रियाशील आणि अक्रियाशील सभासद प्रक्रियेची सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी बँकेचे कायदेशीर सल्लागार अॅड. सुभाष मुंढेकर, अॅड. दिलीप पाटील, बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख व संचालक विनोद कुलकर्णी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी, संचालक जयवंत भोसले, निशांत पाटील, प्रा. अरुण यादव, आनंदराव कणसे, माधव सारडा, अमोल मोहिते, अशोक मोने, डॉ. चेतना माजगावकर, सौ. सुजाता राजेमहाडिक, चंद्रशेखर घोडके (सराफ), वसंतराव लेवे, वजीर नदाफ, अविनाश बाचल, रवींद्र माने, रामचंद्र साठे, नारायण लोहार, विजय बडेकर, तज्ञ संचालक ओंकार पोतदार, निमंत्रित संचालक अजित साळुंखे, प्रीतम शहा, सेवक संचालक राजेंद्र साळुंखे, व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, उपव्यवस्थापक मच्छिंद्र जगदाळे, अधिकारी व सेवक वर्ग, बहुसंख्येने सन्मानीय सभासद उपस्थित होते. बाळासाहेब गोसावी यांनी उपस्थित सर्वांचे आणि बँकेला सहकार्य करणा-यांचे आभार मानले.

Adv