कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात नेमके पालिकेने काय काय केले आहे?,शहरात गरजवंत नागरिकांना मदत दिली जाते का?,याचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष सौ.माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरसेवकांची बैठक पार पडली. सोशल डिस्टन्स व नियम ठेवून ही बैठक घेतली होती.मात्र, पालिकेत मुख्याधिकारी शंकर गोरे हे असून ही तब्बल दोन तास या बैठकीला हजर राहिले नाहीत.त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वच नगरसेवकांनी नगराध्यक्षाना फोन लावून विचारणा करण्याची विनंती केली.तरीही आले नसल्याने गोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावत उद्या शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सविस्तर आढावा घेण्यात येणार असून जर मुख्याधिकारी गोरे हे हजर राहिले नाहीत तर सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी आणि भाजपचे नगरसेवक पुढचे पाऊल उचलणार आहेत. आयोजित करण्यात आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या बैठकीला नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती सौ.अनिता घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, विरोधी पक्ष नेते अशोक मोने, नगरविकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक रवी ढोणे, साविआच्या नगरसेविका स्मिता घोडके, संगीता आवळे आदी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाज कसे सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीला मुख्याधिकारी शंकर गोरे हे उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली.पालिकेने आवाहन केल्यानंतर सर्व दानशूर मंडळी मदत पालिकेकडे करत आहेत.पण हे मुख्याधिकारी नेमके कोणाला वाटप करत आहेत हेच समजत नाही.त्यांनीच येथे सांगितले पाहिजे, कोणकोणला वाटले ते, त्यांना फोन लावा अन बोलवून घ्या अशी नगरसेवकांनी विनंती केली.त्यावरून नगराध्यक्षा सौ.कदम यांनी पालिकेच्या ऑपरेटरकडून मुख्याधिकारी गोरे यांना फोन लावला तर गोरे यांनी छानसे उत्तर दिले.पालिकेत असून ही ते बैठकीला आले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.मोने यांनी तर माझ्या 35 वर्षाच्या काळात असला अधिकारी पाहिला नाही.
किती वेळा अशी वागणूक आपण खपवून घ्यायची.आपण लोकांसाठी काम करतो अशी खंत व्यक्त केली.तर स्मिता घोडके यांनी ही पालिकेच्यावतीने आवाहन केल्याने सामजिक कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मदत दिली.,दिलेली मदत नेमकी कोणाला पोहचली हे कळायला हवे,असे मत मांडले.रवी ढोणे यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी अगोदर सातारा शहरातील जे उपेक्षित नागरिक आहेत त्यांना मदत दिली जावी मग बाहेरच्यांना मदत द्या.नक्की कोणाला वाटप केले जाते.कोठे वाटप केले जाते हे आम्हाला ही कळायला हवे, असा मुद्दा मांडला.अधिकारी कोणीच नसल्याने नगरसेवकांना काहीच आढावा घेता आला नाही.मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याबाबतीत नाराजी व्यक्त करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी नगरसेवकांनी केली.त्यानुसार नगराध्यक्ष माधवी कदम यांनी मुख्याधिकारी गोरे यांना तशी नोटीस बजावल्याचे समजते.दरम्यान, याच विषयावर उद्या 11 वाजता पालिकेत बैठक होणार आहे.त्यावर मुख्याधिकारी गोरे यांची चांगली कोंडी होण्याची शक्यता आहे.मात्र, ते जर बैठकीला आले नाहीत तर सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी आणि भाजपचे नगरसेवक आपली भूमिका उद्या घेणार आहेत, असे ही समजते.
मुख्याधिकारी पालिकेतच?
आयोजित बैठक मुख्याधिकारी शंकर गोरे यांना माहिती असून ते बैठकीला फिरकले नाहीत.पालिकेतच एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये बसून सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होते.त्यांच्या या बैठकीला न येण्याबाबत उलटसुलट पालिकेत चर्चा सुरू होती. जिल्हाधिकारी यांच्या नावापुढे मुख्याधिकारी गोरे हे मनमानी करत असल्याचे काही नगरसेवकांनी या बैठकीत मुद्दा मांडला.