सातारा जिल्ह्यात दोन मंत्री, विधानपरिषद सभापती तीन खासदार, १२ आमदार अशी दिग्गज प्रमुख नेतेमंडळी आणि त्या प्रत्येकाकडील कार्यकर्त्यांची फौज, हा सारा लवाजमा गायब आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या संपर्कातून जिल्ह्याला व प्रशासनाला भरघोस मदत केली मात्र काही आमदार, खासदार रिंगणात दिसतात, ते मास्क, सॅनिटायझर, धान्यवाटप असे उपक्रम राबवताना. लॉंकडाऊनच्या काळात तेही गरजेचे होतेच; परंतु त्याही पलीकडे जाऊन जिल्ह्याची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनावर किमान जरब ठेवायला हवी होती.
सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री व गृहराज्यमंत्री या मंत्र्यांचे तालुकेच हॉटस्पॉट झालेत, तरी राजकीय नेतेमंडळी आपापल्या व्यापात “क्वारंटाइन’ आहेत. मुंबई, पुण्यातून आलेल्या लोकांच्या लोंढ्यामुळे नवनवे हॉटस्पॉट उदयाला येत आहेत. हे सारं सावरायला किती काळ लागेल, हे कुणालाच सांगता येणार नाही; पण म्हणून रणांगणाकडे फिरकायचेच नाही, हे राजकारण्यांचे धोरण खाईत नेणारे ठरू शकते. आता तरी नेतेमंडळींनी पुढाकार घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला नेमकी दिशा दिली पाहिजे
करोना हद्दपार करण्याचा निर्धार फक्त बोलण्यापुरता ठरू नये. प्रत्येकाने योगदान दिले तरच जिल्ह्यावरचे संकट आपण दूर करू शकू. आता हे संकट अधिक गहिरे होत चालल्याने आरोग्य सुविधांपसून अनेक गोष्टींसाठी राजकीय व्यक्तींनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन ही लढाई अंतिम दिशेकडे नेण्याची गरज असल्याचे मत जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे
अनेक त्रुटींमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीचे उत्तरदायित्व कोणाचे, या साऱ्यावर योग्य नियंत्रण असणार की नाही, हे प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत. म्हणूनच करोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.