सातारा पालिकेच्या बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून दिलीप चिद्रे हे सोमवारी हजर झाले . अभियंता भाऊसाहेब पाटील यांची अद्याप बदली न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात खुर्ची एक आणि कारभारी दोन असा पेच निर्माण झाला आहे .
या पेचावर मुख्याधिकारी अभिजीत बापट कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे . सोमवारी मुख्य अभियंता म्हणून दिलीप चिद्रे हजर झाल्यावर त्यांनी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजीत बापट म्हणून यांची भेट घेतली . चिद्रे यांची विकास कामाच्या पूर्ततेवर आणि तांत्रिक दृष्टया काम निर्दोष कसे होईल या बाबींवर कटाक्ष असल्याने त्यांची जवाबदारीने काम करणारा अभियंता म्हणून ओळख आहे .जून 2013 ते जून 2016 या दरम्यान चिद्रे यांनी साताऱ्यात मुख्याधिकारी अभिजीत बापट म्हणून यांच्यासमवेत काम केले असून हीच जोडी पुन्हा कामाच्या निमित्ताने एकत्र आली आहे .
भाऊसाहेब पाटील यांची बदली मंत्रालय पातळीवरून लटकल्याने भाऊसाहेब अजूनही साताऱ्यातच आहेत . वास्तविक चिद्रे जुलैमध्ये सातारा पालिकेत रिपोर्ट करून पुन्हा बदलीच्या प्रयत्नात राहिले . त्यांना लातूरसाठी बदली हवी होती मात्र प्रशासकीय कारणांमुळे चिद्रे तातडीने सातारा पालिकेत हजर झाल्याने बांधकाम विभागात भाऊसाहेब पाटील व दिलीप चिद्रे या समकक्ष मुख्य अभियंत्यामध्ये कामाच्या विभागणीचा खरा कळीचा मुद्दा आहे . कदाचित शासकीय प्रकल्प चिद्रे यांच्याकडे व नगर पालिका फंडातील कामांची जवाबदारी भाऊसाहेब पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे .