करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री चवणेश्वराची यात्रा रद्द सासनकाठ्या, भाविकांना बंदी; मानाची लोटांगणेही होणार नाहीत

115
Adv

पिंपोडे बुद्रुक, दि.(प्रतिनिधी) – लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र चवणेश्वर (ता. कोरेगाव) येथील श्री चवणेश्वराची वार्षिक यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रद्द केली आहे. विविध ठिकाणांहून येणार्‍या मानाच्या सासनकाठ्यांना बंदी घालण्यात आली असून भाविकांनाही मंदिर परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मानाची लोटांगणेही रद्द करण्यात आली असून परगावच्या भाविक, भक्तांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम, वाठारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही याबाबत आदेश करुन मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यास मनाई केली आहे. सध्य परिस्थितीतही करोनाचा प्रादुर्भाव असल्याने श्री चवणेश्वराची यात्रा होणार की नाही याची उत्सुकता लागली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी चवणेश्वर येथे तहसीलदार अमोल कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस चवणेश्वरचे सरपंच दयानंद शेरे, करंजखोपचे सरपंच लालासाहेब नेवसे, रणदुल्लाबादचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, पोलिस पाटील दादा देशमुख, किरण पवार, गाव कामगार तलाठी राहुल नाळे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. निंबाळकर, पोलिस हवालदार गहिण, सतीश धुमाळ, राजेंद्र धुमाळ, मंदिराचे पुजारी रमेश पवार यांच्यासह वाण्याचीवाडी, गुळुंब, रणदुल्लाबाद, करंजखोप पंचक्रोशीतील मानकरी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष पवार यांनी चवणेश्वर यात्रेची पार्श्वभूमी विषद केली. सध्याच्या करोना परिस्थितीत यात्रा भरवणे उचित ठरणार नाही. प्रशासनावर विनाकारण ताण येणार आहे. करोनाच्या संकटात सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करुन शनिवार (दि. 7) आणि रविवारी (दि. 8) होणारी यात्रा रद्द करुन परंपरेनुसार होणारे धार्मिक विधी मोजक्या लोकांमध्ये करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. काही मानकर्‍यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सासनकाठ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तहसीलदार अमोल कदम यांनी चवणेश्वर ग्रामस्थ आणि मानकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सध्य परिस्थितीत यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मंदिर बंद राहणार असून सासनकाठ्या, मानाची लोटांगणे, छबिना यांना मनाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गावात येणारे सर्व रस्ते, पाऊलवाटांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून चवणेश्वर ग्रामस्थ सोडून कोणासही गावात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
चवणेश्वर हे गाव दुर्गम असून सध्य परिस्थितीत करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविक भक्तांनी प्रशासनास सहकार्य करुन यात्रेदिवशी चवणेश्वर येथे येण्याचे टाळावे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी सांगितले. प्रारंभी सरपंच दयानंद शेरे यांच्या हस्ते अमोल कदम यांचा तर दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते स्वप्निल घोंगडे याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. उध्दव पवार यांनी सूत्रसंचालन केले. हरीदास शेरे यांनी आभार मानले.

*यात्रेत कशाला असणार बंदी-*
मंदिर उघडण्यास परवानगी नाही
देवाचा छबिना काढता येणार नाही
सासनकाठ्यांना मनाई
मानाच्या लोटांगणांना मनाई
सर्व रस्ते बंद करुन भाविकांना मनाई

फोटो –
चवणेश्वर (ता. कोरेगाव) येथे तहसीलदार अमोल कदम यांचा सत्कार करताना दयानंद शेरे, शेजारी स्वप्निल घोंगडे, संतोष पवार व इतर.

Adv