गेल्या तीन महिन्यात लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून सातारा पालिकेने कोविड च्या निर्मूलनावर किती खर्च केला याचा ताळेबंद मांडणारी फाईल गायब झाली आहे . कोविड प्रतिबंध कक्ष प्रमुख प्रणव पवार यांच्याकडून खर्चचा तपशील देण्यास टाळाटाळ सुरू झाली आहे .
दरम्यान खर्चाचा तपशील च मिळत नसल्याने पालिकेची सर्वसाधारण सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या सशर्त परवानगीनंतरही लांबणीवर पडली आहे . उपमुख्याधिकारी धुमाळ यांच्या लाच प्रकरणात संपूर्ण पालिकेची अब्रू वेशीला टांगली गेली . पकडला तो चोर या न्यायाने कोविड निर्मूलनाचे प्रभावी काम करणाऱ्या धुमाळांचा बळी गेला . वर्षानुवर्ष पालिकेत मलिदा ओरपणारी बडी धेंडं बाजूलाच राहिली . मुख्याधिकारी शंकर गोरे हेच या आरोग्य प्रकरणात प्रमुख चर्चेच्या केंद्रस्थानी होते मात्र आरोग्य विभागाची पोलखोल झाल्यावर आरोग्य विभागाच्या अनेक फायलींवर आपण स्वाक्षरीच केली नसल्याचा विश्वामित्री खुलासा गोरे यांनी केला होता . आता कोविड कक्षाची जवाबदारी परिवहन विभागाच्या प्रणव पवार यांच्याकडे आहे . मात्र कोविड व्यवस्थापनाची पवार बुध्दी प्रणव साहेबांकडे नाही . काही सतर्क सातारकर, प्रसारमाध्यमे नगरसेवक यांनी पालिकेने एकूण कोविड वर किती खर्च केला याच्या तपशीलाच्या प्रतीक्षेत आहेत . मात्र प्रणव पवार यांनी कानावर हात ठेवत आरोग्य विभागाकडे बोट दाखवले . नियंत्रण आमच्याकडून होते मात्र खर्चाचा तपशील तुम्ही आरोग्य विभागातून घ्या असे सरधोपट उत्तर दिल्याने पवारांच्या कामाचा आवाका काय आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही
कोविड प्रमाणेच अनेक महत्वपूर्ण फायली पालिकेतून गायब करण्यात आल्याची चर्चा आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करेल या भीतीने एका सिल्वर रंगाच्या स्कूटरवरून महत्वपूर्ण फायलींचा गठ्ठा हातोहात गायब करण्यात आला . त्या फायली नक्की कोठे गेल्या हे अजूनही गुलदस्त्यातच आहे . कोविडच्या खर्चाचा तपशील मिळत नाही म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सशर्त परवानगी दिलेली सर्वसाधारण सभा विनाकारण अडकून पडली आहे . नगराध्यक्ष माधवी कदम यांनी तीन वेळा मागणी करूनही त्यांना कोविडच्या खर्चाचा तपशील मिळालेला नाही .एकूण पालिकेचा झालेला खर्च आणि काही खरेदीत आणि भाडे आकारणीत दरांचे मुद्दाम करण्यात आलेले चढउतार यामुळे या कोविडच्या खर्च तपशीलाची वादग्रस्तता वाढली आहे .आरोग्य विभागासह पालिकेच्या अबूचा इतका पंचनामा होउनही सरकारी छापाची व्यवस्था मात्र येथे बदलायला तयार नाही . कोविडच्या खर्चाचा चेंडू आरोग्य विभाग व प्रणव पवार यांच्यातच सातत्याने टोलवला जात आहे . त्यामुळे पाय फुटलेली कोविड च्या खर्चाच्या फाईल चा सुरू असलेला लपंडाव मात्र थांबलेला नाही .
चौकट-
माझी बदली करा?
आपल्या अगाध कर्तुत्वाची साडेतीन वर्ष साताऱ्यात घालवणाऱ्या मुख्याधिकारी शंकर गोरे यांची जलमंदिरवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आरोग्य विभागाचे ढिसाळ कामकाज , व इतर गैरव्यवस्थापनावरून चांगलीच कानउघाडणी केली असल्याची चर्चा दोन दिवस साताऱ्यामध्ये आहे. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे यांना म्हणाले मी साताऱ्यात थांबत नाही तुम्ही माझी बदली करा अशीही चर्चा रंगू लागली आहे.