खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तसेच संजय राऊत यांच्या विरोधातही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
शहरातील दुकानदारांनी आपापली दुकाने तत्काळ बंद केली. दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावांची पाटी घालण्यात आली होती. या दोन्ही गाढवांची पोवई नाक्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात केला. बसस्थानक, राजवाडा, मोती चौक या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. बंदमुळे शाळांनाही सुटी देण्यात आली. सकाळपासून शहरातील एसटी आणि रिक्षा वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. शहरातून दुचाकी रॅलीद्वारे उदयनराजेंचे समर्थक बंदचे आवाहन करत होते.
अत्यावश्यक सेवा वगळता सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनात नगराध्यक्ष माधवी कदम, सुनील काटकर, उपाध्यक्ष किशोर शिंदे, दत्तात्रेय बनकर, अर्चना देशमुख, सुजाताा राजेमहाडिक, अनिता घोरपडे, निशांत पाटील,बबलु साळुंखे युवा नेते संग्राम बर्गे सातारा विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने उदयनराजे समर्थक उपस्थित होते.