कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बँकांमध्ये होणारी गर्दी टाळावी. ग्राहकांनी बँकेत येण्यापेक्षा मोबाइल बँकिंग, पैसे भरण्याचे मशीन तसेच एटीएमचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
बँका या अत्यावशक सेवा प्रकारात येत असल्याने बँकांची शाखा कार्यालये ग्राहकांसाठी खुली राहणार आहेत. परंतु शाखा कार्यालयामधील गर्दी रोखणे हे कर्मचारी तथा ग्राहकांसाठी एक आव्हान आहे. ज्या व्यक्तीचे काम आहे, त्याच व्यक्तीने केवळ बँकेमध्ये यावे आणि कर्मचारी तसेच इतर ग्राहक यांच्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. तंत्रज्ञानाच्या सहायाने आणि बँकांकडे असलेल्या डिजिटल बँकिंग सुविधामुळे ग्राहक बहुतांश व्यवहार बँकांमध्ये न येताही करू शकतात.
नुकतेच रिझर्व्ह बँकेने रोखीचे व्यवहार टाळा आणि डिजिटल बँकिंगचा जास्तीत जास्त उपयोग करा, असे आवाहन सर्व ग्राहकांना केले आहे. सातारा जिल्ह्यात एकूण ३८ बँका असून ५७५ शाखा आहेत व बँकांकडून १ हजार ३८ व्यवसाय प्रतिनिधींची नियुक्तीही केली आहे . सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ४६८ एटीएम सेंटर आहेत. सर्व ग्राहकांनर बँकेमध्ये गर्दी न करता मोबाईल अॅप सुविधा, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकींग, भीम ॲप आरटीजीएस, एनईएफटी अशा प्रकारच्या ऑनलाइन अॅपचा वापर करून बँकांमध्ये होणारी गर्दी टाळावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.