कोरोना सारख्या महाभयंकर महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ दिली तरच कोरोना विरोधातील लढाईत विजय मिळणार आहे. कोरोनाचे संकट अधिक वाढले असून प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे आणि कोरोनापासून दूर राहणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा शहरातील प्रभाग क्र. १८ मधील आणि संपूर्ण पश्चिम भागातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी नगरसेवक अविनाश कदम यांनी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिकम अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्या स्वतः विकत घेवून त्या नागरिकांना मोफत वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कदम यांनी तब्बल २० हजार लोकांसाठी औषधाच्या ४ हजार बाटल्या विकत घेतल्या असून औषध वाटपाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवक कदम यांच्या उपक्रमाचे कौतुक करून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक कदम यांच्यासह प्रशांत थोरात, राजेंद्र भागवत, संजय ढवळे, अभिजीत कुलकर्णी, संजय पवार, संदीप शिंदे, सुनील प्रभुणे, राम पवार, अभय गरगटे, बिपीन साने, आदित्य धर्माधिकारी, विनीत कुलकर्णी, सुबोध साने, उमेश चक्रदेव, शेखर जाधव, ओंकार कदम, अक्षय कदम, यश कदम, ऋतुराज कदम आदी उपस्थित होते.
नगरसेवक कदम यांनी डॉ. अभिजित गुरव यांच्या सहकार्याने २० हजार लोकांना पुरतील एवढे औषध खरेदी केले असून या गोळ्या शहराच्या पश्चिम भागातील लोकांना घरपोच मोफत वाटण्यात येत आहे.नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल उचलले गेले असून सर्व प्रकारची दुकाने सुरु केली आहेत. असे असले तरी कोरोनाचे संकट अजून कायम असून त्याची तीव्रता कमी झालेली नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे. दुकाने उघडली म्हणून विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये. चला फेरफटका मारून येवू, असे बेजाबदार वर्तन करून प्रशासनाच्या अडचणी वाढवू नये. मिळालेल्या सवलतीचा सुयोग्य वापर करून गरजेपुरतेच घराबाहेर पडावे आणि काम झाले कि लगेच घरी परत जावे. कोरोना हा आजार कोणालाही होऊ शकतो,
याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. हा आजार एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर पाळणे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनी होमिओपॅथिक औषधांचा वापर करून रोग प्रतिकारक शक्ती वाढवावी तसेच स्वतःला कोरोना होऊ नये यासाठी हरप्रकारे काळजी घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांना केले आहे.