सातारा पालिका व पुणे येथील कॅम फाऊंडेशच्या विद्यमाने शाहू कला मंदिर येथे सफाई कर्मचाºयांचे प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिरात स्वच्छता करताना घ्यावयाची काळजी, स्वच्छता मोहीम कशी राबवावी, आरोग्य, कायदे याबाबत कर्मचाऱ्यांना प्रबोधन करून सुरक्षेच्या साधनांचे वाटपही करण्यात आले.
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, आरोग्य विभाग प्रमुख सुहास पवार व ‘कॅम’च्या सीईओ डॉ. स्मिता सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले.
डॉ. स्मिता सिंग म्हणाल्या, ‘आरोग्य कर्मचारी शहर स्वच्छतेचा महत्वाचा दुवा आहे. स्वच्छतेचे काम अत्यंत जोखमीचे आहे. हे करत असताना कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा विविध आजार जडतात. हे आजार होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करताना विशेष काळजी घेणे गरजेचे. मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट अशा सुरक्षेच्या साधनांचा नियमीत वापर करावा. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहितीही यावेळी देण्यात आली. पालिकेतील २४० आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. मंगळवारी या शिबिराचा समारोप झाला. दरम्यान, कॅम फाऊंडेशनच्या वतीने कर्मचाऱ्यांना हॅन्डग्लोज, जॅकेट व कॅपचे वाटप करण्यात आले.
करोना काळात पालिकेतील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी जबाबदारीने काम करीत असल्याने सांगून नगराध्यक्षा माधवी कदम व आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी कर्मचाºयांचे कौतुक केले.