Monday, April 20, 2026
spot_img
Home Maharashtra जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी व्यापक प्रयत्न व सर्वांचे योगदान महत्वाचे...

जादूटोणाविरोधी कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होण्यासाठी व्यापक प्रयत्न व सर्वांचे योगदान महत्वाचे – धनंजय मुंडे

285
Adv

*मुंबई (दि. 06) – जादूटोणाविरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून, अंधश्रद्धाळू अफवा व त्यामधून घडणाऱ्या कुप्रथा यांना आळा घालण्यासाठी या कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली या कायद्याची प्रचार व प्रसार समिती स्थापन केली, आहे या समितीच्या माध्यमातून व्यापक प्रयत्नांची गरज असून त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीच्या वतीने पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते (ऑनलाईन) उद्घाटन करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत, मात्र आजही काही भागात नरबळी, अंधश्रद्धांच्या माध्यमातून लैंगिक शोषण, अत्याचार असे अनेक प्रकार घडल्याचे कानावर येतात, त्यात कायदा आपले काम करतोच परंतु या कायद्याची कडक अंमलबजावणी होऊन हे प्रकार कायमचे थांबले पाहिजेत, यासाठी या कायद्याचा अधिकाधिक प्रसार जनसामान्य वर्गात व्हायला हवा, या दृष्टीने एक ऍक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देशही धनंजय मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

समाजाला अंधश्रद्धांच्या विळख्यातून बाहेर काढून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हा कायदा पोषक असून, विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक प्रसार मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे यावेळी म्हणाले.

कार्यशाळेस जादूटोणाविरोधी कायदा प्रसार समितीचे सहअध्यक्ष श्री. श्याम मानव तसेच समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. औपचारिक उद्धाटन प्रसंगी सचिव श्री. सुमंत भांगे, समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके, भारत केंद्रे, प्रशांत चव्हाण, रवींद्र कदम, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी तसेच समाज कल्याण विभागाचे सर्व जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांसह आदी उपस्थित होते.

Adv