सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक केवळ एका सहकारी संस्थेच्या सत्तेसाठी नव्हती, तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ठरली. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने मिळवलेल्या यशामुळे सहकार क्षेत्रातील नेतृत्वाची धुरा सांभाळण्याच्या त्यांच्या क्षमतेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून दिलेल्या आव्हानाला सभासदांनी मतपेटीतून उत्तर दिले.
अजित पवार यांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर कारखान्यावर आपला प्रभाव कायम ठेवला होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या नेतृत्वापुढे नवे आव्हान उभे राहिले. पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे कारखान्याच्या निकालाकडे केवळ सभासदच नव्हे, तर राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते.
या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी पुत्र जय पवार यांच्यासह प्रचाराची सूत्रे हातात घेतली. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांशी संपर्क साधत त्यांनी विकासाचा मुद्दा मांडला. अजितदादांनी उभ्या केलेल्या सहकार क्षेत्रातील राजकीय प्रभावाची जबाबदारी पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. दुसरीकडे, जगताप यांच्या बंडखोरीमुळे पवार नेतृत्वाला थेट आव्हान मिळाले होते.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने विजय मिळवल्यानंतर युवा नेते श्री. जय अजितदादा पवार यांनी सर्व विजयी उमेदवारांसह स्व. लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली.
यावेळी जय पवार यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील हा विजय स्व. अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला.
स्व. अजितदादा पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान आणि सोमेश्वर कारखान्याशी असलेले त्यांचे नाते यांचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.






