आपली सुटी संपवून परत देशसेवेसाठी निघालेल्या पांगरी ता. परळी येथील बीएसएफ जवान वैभव मुंडे याला आज धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन व प्रत्यक्ष अनुभूती घडली! श्रीनगरला जाणारे विमान उशीर झाल्याने चुकले, तितक्यात मुंबईला निघालेल्या ना. धनंजय मुंडे यांची अचानक भेट झाली अन वैभवला श्रीनगरचे दुसऱ्या विमानाचे तिकीट मिळाले!
त्याचे झाले असे की, देशसेवेसाठी श्रीनगरला रुजू व्हायला निघालेल्या वैभवचे औरंगाबाद येथून दिल्ली मार्गे श्रीनगर साठी आज सकाळी ८.००वा. विमान होते. परंतु औरंगाबादला येणारी रेल्वे लेट झाल्यामुळे विमानतळावर पोहचण्यास वैभवला उशीर झाला. अगदी थोडक्यात स्पाईस जेटचे विमान चुकले. त्यामुळे वेळेवर बीएसएफ मुख्यालयात पोहचणार की उशिरा पोहचल्यामुळे कारवाईचा सामना करावा लागणार? या चिंतेत विमानतळावरच बसलेल्या जवान वैभव मुंडे यांच्या मदतीस अचानक राज्याचे सामाजिक न्याय मंत्री अनपेक्षितपणे धावून आले!
बीड जिल्ह्याचा 2 दिवसांचा दौरा आटोपून औरंगाबाद येथून मुंबईकडे निघालेल्या धनंजय मुंडे यांनी विमानतळावर अचानक भेटलेल्या आपल्याच परळी तालुक्यातील पांगरी येथील या जवानाची आस्थेवाईकपणे चौकशी केली, घडलेला प्रकार कळताच आपल्या कार्यालयामार्फत मुंडेंनी तात्काळ जवान वैभव साठी एअर इंडिया च्या AI 442 या विमानाचे औरंगाबाद – दिल्ली – श्रीनगर असे तिकीट काढून दिले आणि काही क्षणांपूर्वी चिंताग्रस्त असलेल्या जवान वैभव मुंडे सुटकेचा निःश्वास सोडला.
आपले कुटुंब, नातेवाईक, गावच नव्हे तर राज्य सोडून आपला प्राण पणाला लावून देशसेवा करणाऱ्या जवानाप्रति धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या आस्थेतून त्यांची सामजिक संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली. बीएसएफ जवान वैभव यानेही ना. मुंडे यांच्यातील संवेदनशील ‘माणुसकीचे’ आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.