Thursday, November 26, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा परिषदेत छ उदयनराजे व जयकुमार गोरे यांचे फोटो झळकले

जिल्हा परिषदेत छ उदयनराजे व जयकुमार गोरे यांचे फोटो झळकले

551
Adv

सातारा जिल्हा परिषद हीच नामदार जयकुमार गोरे यांच्या राजकीय जडणघडणीची महत्त्वाची कर्मभूमी! याच जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विरोधी बाकावरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले. त्यांच्या आक्रमक भूमिकेची चर्चा जिल्हा परिषदेत होत असे. इतकेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देतानाही तत्कालीन पालकमंत्री, खासदार आणि आमदारांना जयकुमार गोरे यांच्याबाबत विचार करावा लागत असल्याच्या आठवणी आजही सांगितल्या जातात.
काळ बदलला, राजकीय समीकरणे बदलली आणि त्याच जिल्हा परिषदेतील विरोधी बाकावरून राजकीय वाटचाल सुरू करणारे जयकुमार गोरे आज राज्याचे ग्रामविकास मंत्री झाले आहेत. महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे यांच्या केबिनमध्ये आज नामदार जयकुमार गोरे यांचा फोटो मोठ्या दिमाखात लावण्यात आला. हा फोटो लावला जात असताना त्यांच्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळातील राजकीय संघर्षाच्या आठवणींना उजाळा मिळाला. विरोधी बाकावरून सुरू झालेला प्रवास त्याच जिल्हा परिषदेत मंत्रिपदाच्या सन्मानापर्यंत पोहोचल्याची ही एक वेगळीच राजकीय कहाणी
समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्या केबिनमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले असून, यामागे जुन्या मैत्रीच्या आणि राजकीय आठवणींच्या संबंधांचीही पार्श्वभूमी आहे. ऋषिकेश धायगुडे-पाटील यांचे वडील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश धायगुडे-पाटील आणि उदयनराजे भोसले यांचे जुने मित्रत्वाचे संबंध असून, दोन्ही कुटुंबांमध्ये आजही घरोब्याचे संबंध आहेत. तर दुसरीकडे, जयकुमार गोरे जिल्हा परिषद सदस्य असताना अविनाश धायगुडे-पाटील आणि जयकुमार गोरे हे सभागृहात शेजारी शेजारी बसून सत्ताधाऱ्यांना आपल्या आक्रमक भाषणांनी जाब विचारत असत.

Adv