Thursday, November 26, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जयकुमार गोरेंच्या निर्णयाने राजकीय गणिते बदलणार

जयकुमार गोरेंच्या निर्णयाने राजकीय गणिते बदलणार

10
Adv

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करताना येणाऱ्या अपूर्णांकाच्या गणनेबाबत ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विभागाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला प्रशासकीय स्पष्टता मिळणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या १० टक्के किंवा किमान पाच सदस्य, यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे नामनिर्देशित सदस्य असतील. तर पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या २० टक्के किंवा किमान एक सदस्य, यापैकी जी संख्या अधिक असेल तेवढे सदस्य नामनिर्देशित करता येणार आहेत. विशेष म्हणजे, अपूर्णांक ०.५० पेक्षा कमी असल्यास तो विचारात घेतला जाणार नाही, तर ०.५० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास त्याची गणना एक पूर्ण सदस्य म्हणून केली जाणार आहे.
ग्रामविकास विभागाच्या या निर्देशांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करताना असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषदांच्या राजकीय समीकरणांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या निर्देशांकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Adv