जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला या नामकरणासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी प्रथम मागणी केली होती
उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्याच वर्षांपासून शासनाकडे होत होती.
उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे.
विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे






