शिवयात्रेसाठी धावणार भारत गौरव ट्रेन

119
Adv

केंद्रीय रेल्वेमंत्री ना.अश्विनी वैष्णव तसेच मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने, भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनने, भारत गौरव टुरिस्ट ट्रेनव्दारे दिनांक 9 जून ते 14 जुनच्या पहाटेपर्यंत पाच दिवसांचा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट (परिक्रमा ) पर्यटन व ऐतिहासिक ज्ञान ग्रहण उपक्रम सुरु होत आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त व्यक्तींनी लाभ घेवून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देवून नवीन उर्जा प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

भारतासारख्या विशाल आणि सर्वांत मोठया लोकशाहीच्या देशाला एकात्मकतेमध्ये राखण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची विचार आणि शिकवण सर्वश्रेष्ठ ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वधर्म समभावाचा विचार, राज्यकारभारात रयतेचे सहभाग, आजही पथदर्शी आहेत. याच विचारांवर देशाचे मार्गक्रमण सुरु आहे. छत्रपतींच्या धगधगत्या इतिहासामधून युवापिढीला उर्जा प्रेरणा मिळावी याच एकमेव उद्देशाने, बुध्द सर्किट प्रमाणे शिवस्वराज्य सर्किट, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई आणि दिल्ली येथे भव्य स्मारक, शासनमान्य इतिहास प्रसिध्द करणे, बदनामी प्रतिबंधक कठोर कायदा करणे, इ. बाबत आमचा पाठपुरावा सुरु आहे.
या पार्श्वभुमीवर शिवप्रभुंच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या ठिकाणांना विशेष रेल्वेने भेट देण्याचा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा उपक्रम भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपनीमार्फत सुरु होत आहे. भारत गौरव ट्रेनव्दारे प्रवास करणा-या प्रवाश्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मापासून स्वराज्याचे उदिष्ट साध्य होईपर्यंतच्या जीवनकार्यात रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्हयातील ज्या ठिकाणी ऐतिहासिक अतिमहत्वाच्या घटना घडल्या त्या ठिकाणांना भेटी देता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजरामर इतिहास साक्षात पहाता-अनुभवता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई येथुन दिनांक 9 जुन 2025 रोजी सकाळी 6.30 वांजता सुटणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन दादर-मुबई आणि ठाणे या ठिकाणी थांबून कोकण रेल्वेने माणगांव- व तेथुन किल्लेरायगड दर्शन झाल्यावर पुणे येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर दिनांक 10 जुन रोजी लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी पाहील्यावर दुसरा मुक्काम पुणे येथेच असणार आहे. दिनाक 11 जुन रोजी किल्ले शिवनेरी, तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी एक असणा-या श्री क्षेत्र भिमाशंकर ज्योर्तिलिंग दर्शन, व तिसरा मुक्काम पुण्यात असणार आहे. दिनांक 12 रोजी सातारा येथे गौरवट्रेन येणार असून, किल्ले प्रतापगड दर्शन केल्यावर शाहु महाराज टर्मिनल्स कोल्हापूर कडे भारत गौरव ट्रेन प्रयाण करणार आहे. चौथ्या दिवसाचा मुक्काम कोल्हापूरकडे जाणा-या प्रवासात असणार आहे. दिनांक 13 रोजी श्री महालक्ष्मी मंदिर दर्शन आणि किल्ले पन्हाळा दर्शन करुन दिनांक 13 रोजीच्या रात्री 8 वांजता सदरची ट्रेन मुंबईकडे परतणार आहे. पाचवा मुक्काम कोल्हापूर ते मुंबई या रेल्वे प्रवासातच असेल. दिनांक 14 रोजी पहाटे 6 वांजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन परतणार आहे. येता-जाता दादर आणि ठाणे याठिकाणी प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश किंवा उतरणे शक्य असणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज परिक्रमा करण्यासाठी धावणार आहे. ट्रेनमध्ये इकॉनॉमी (स्लीपर), आरामदायी (3 एसी) आणि सुपीरिअर (श्रेष्ठ) असे प्रवासाचे तीन प्रकार असून, प्रतिमाणशी अनुक्रमे 13,155/-, 19840 आणि 27,365/- असे तिकीटांचे दर आहेत. या खर्चात मुक्काम, गाडीमधील किंवा गाडीबाहेरील शाकाहारी जेवण, नाष्टा, ऐतिहासिक ठिकाण भेटीचा प्रवास, प्रवेश फि, रोपवे चार्जेस, ट्रेनची सुरक्षा, प्रवाशांचा प्रवासी वीमा, सर्व प्रकारचे लागु असलेले कर, यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन कार्पोरेशनच्या माध्यमातुन हा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच सुरु होत आहे.
छत्रपतींचे वास्तव जीवन कार्य – चरित्र आणि छत्रपतींचा अलौकिक वारसा, पर्यटनाच्या माध्यमातुन प्रत्यक्ष पहाण्याची-अनुभवण्याची संधी या टुरिस्ट ट्रेन परिक्रमेमुळे नागरीकांना मिळणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज (सर्किट) परिक्रमेच्या भारत गौरव ट्रेनला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.      
                                                      

Adv