शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन

403
Adv

सातारा, दि.18 (): यंदाचा सातारचा शाही दसरा उत्सव पारंपारिक लवाजम्यासह मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या शाही दसरा उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभागांनी आपआपले योगदान द्यावे,अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या तर्फे साजरा होणाऱ्या पारंपारिक शाही दसरा सोहळ्यामध्ये यावर्षीपासून शासनाचा सहभाग असणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधीक्षक समिर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादवे घुले,प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सुनिल काटकर, काका धुमाळ,जितेंद्र खानविलकर,संग्राम बर्गे, विनित पाटील,पंकज चव्हाणसौरभ सुपेकर आदी उपस्थित होते.

शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रांताधिकारी सातारा यांना सन्मवयक म्हणून नियुक्ती करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले,जलमंदिर येथे पालखीमध्ये भवानी तलवार पुजनावेळी पोलीस बॅन्ड पथकाने मान वंदाना द्यावी.मिरवणुकीमध्ये घोडे,उंट यांचाही वापर करावा. यावर बसणाऱ्यांना मावळ्यांचा पोशाख द्यावा. पालखी सोबत समारंभाच्या पोषाखातील पोलीस पथक ठेवावे.शासनातर्फे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे.

दसरा शाही मिरवणुकीला सायंकाळी 5.30 वाजता सुरुवात होईल. ही मिरवणूक जलमंदिर ते शिवतिर्थ अशी होईल. त्याचबरोबर शाही पोवाड्याचे आयोजन करावे. राजपथ मार्ग नगर परिषदेने स्वच्छ करावा. तसेच शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करावी.मिरवणूकीच्या प्रारंभी पोलीस पायलेटींग ठेवावे. या वर्षीचा शाही दसरा सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा करावाचा आहे त्या दृष्टी जबाबदारी दिलेल्या विभागांनी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

Adv