Tuesday, September 8, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City नो फ्लेक्स झोनमध्येच सभापतींचे वाढदिवसाचे फ्लेक्स; पालिकेचे नियम फक्त गोरगरिबांसाठी?

नो फ्लेक्स झोनमध्येच सभापतींचे वाढदिवसाचे फ्लेक्स; पालिकेचे नियम फक्त गोरगरिबांसाठी?

133
Adv

सातारा शहरात अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेकडून कारवाई केली जात असतानाच आता पालिकेने निश्चित केलेल्या ‘नो फ्लेक्स झोन’मध्येच नियोजन सभापतींच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स? झळकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिकेचे नियम सर्वांसाठी समान आहेत की निवडक लोकांसाठी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बोगदा ते समर्थ मंदिर परिसरात गोरगरिबांच्या घरांवर अतिक्रमणाच्या नावाखाली बुलडोझर चालविणाऱ्या पालिका पदाधिकाऱ्यांकडूनच पालिकेच्या फ्लेक्सविषयक नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ‘नियम सांगणारेच नियम मोडत असतील तर शहरातील अतिक्रमण हटविण्याची नैतिकता कुठे राहिली?’ असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर पालिकेच्या नो फ्लेक्स झोनमध्ये येत असल्याचे सांगितले जात असताना तेथे वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यात आल्याने शहर विकास विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘यालाच म्हणायचे का शहर विकास विभागामध्ये नियोजनाचे अतिक्रमण?’ अशी उपरोधिक चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या प्रकरणी नो फ्लेक्स नियमांचे उल्लंघन झाल्याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली असून, पालिका प्रशासन आता संबंधित फ्लेक्सवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी विनोद झळक यांनी केवळ कार्यालयीन बैठका न घेता खुर्ची सोडून शहरात फेरफटका मारावा आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गोरगरिबांच्या घरांवर कारवाईचा बुलडोझर चालविण्यापूर्वी नियमांची अंमलबजावणी सर्वांवर समान होतेय का, हेही पालिका प्रशासनाने तपासावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

याप्रकरणी अमित शिंदे यांनी ऑनलाईन तक्रारही दाखल केली आहे

Adv