गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र साताऱ्यातील आगमन सोहळ्याच्या तारखा अद्यापही गुलदस्त्यात आहेत. पोलिसांच्या परवानगी प्रक्रियेला अवघे काही दिवस उरले असताना प्रशासनाची ही शांतता नेमकी कशासाठी, हा प्रश्न आता शहरभर विचारला जात आहे.
एका बाजूला काही गणेश मंडळांनी महिनाभर आधीच आगमन सोहळ्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. फ्लेक्स, बॅनर, स्वागत कमानी आणि प्रसिद्धीचा धडाका सुरू आहे. दुसऱ्या बाजूला काही मंडळे या घाईला विरोध करत आहेत. मग समान नियम कुठे आहेत? सर्वांसाठी एकच निकष आहे का, की काहींना वेगळे मापदंड लागू आहेत?
आता सर्वांचे लक्ष पोलीस प्रशासन आणि गणेशोत्सव समन्वय बैठकीकडे लागले आहे. वेळेत निर्णय झाला नाही, तर आगमन सोहळ्यावरून पुन्हा शहरातील वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या वर्षी आगमन सोहळ्यावरून साताऱ्यात फ्लेक्स वॉर रंगले. व्यापाऱ्यांमध्ये नाराजी, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास आणि मंडळांमध्ये वाद निर्माण झाले. त्या अनुभवातून प्रशासनाने नेमका कोणता धडा घेतला? की पुन्हा एकदा परिस्थिती चिघळल्यानंतरच यंत्रणा जागी होणार?






