Monday, May 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सातारकरांचा वज्र निर्धार

साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा सातारकरांचा वज्र निर्धार

272
Adv

साताऱ्यात पुढील सहा महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बुधवारी येथील पाठक हॉलमध्ये झालेल्या साहित्यप्रेमी सातारकर साहित्य संस्था सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकजुटीने आणि देखण्या नियोजनाच्या माध्यमातून यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. नियोजनाच्या पहिल्याच बैठकीमध्ये एक लाख पंधरा हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. साताऱ्याला ३२ वर्षानंतर साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे. सर्व सातारकरांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना विनोद कुलकर्णी म्हणाले, १९९३ साली साताऱ्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनानंतर तब्बल ३२ वर्षांनी हा साहित्य संमेलनाचा योग जुळून आला आहे. संमेलनाचे नियोजन हे कोण्या एकाचे काम नाही, हे सर्व सातारकरांचे संमेलन आहे. साताऱ्याचे नाव देश पातळीवर न्यायचे असेल तर सर्व सातारकरांचे सहकार्य आवश्यक आहे. पुढील दीडशे दिवसांमध्ये कोट्यवधी रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट आहे. सातारकरांनी कोणताही मान अपमान न ठेवता, या संमेलनाच्या सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि हा जगन्नाथाच रथ एकजुटीने पुढे न्यावा, असे आवाहन विनोद कुलकर्णी यांनी केले.
रवींद्र बेडकीहाळ म्हणाले, विनोद कुलकर्णी यांच्या पाठीशी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भक्कमपणे उभे आहेत. पुणे येथील साहित्य परिषदेच्या मंडळामध्ये विनोद कुलकर्णी यांच्यासारखा खंदा कार्यकर्ता मिळाला अन् परिवर्तनास खर्ऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
शाहूपुरी शाखेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्याचे व्रत घेतले आहे, त्या सर्व सोहळ्याला आपण प्रयत्नपूर्वक कटिबद्ध राहू, असे आवाहन त्यांनी केले सातारा जिल्ह्यातील विस्मरणात गेलेले साहित्यिक, समाज सुधारक, यांची स्वतंत्र दालने आणि त्यांच्या मूळ जन्म गावापासून साहित्य संमेलनाच्या मांडवापर्यंत ज्योती आणून त्यांच्या आठवणींना पुर्नउजाळा द्यावा, हे नियोजन फलटणच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेने स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, उदय चव्हाण, प्रल्हाद पार्टे, श्रीधर साळुंखे, डॉ. व्ही. एम. भोसले, डॉ. संदीप चौधरी, वसंत शिंदे, सुधीर विसापुरे, पद्माकर पाठकजी, प्राचार्य रमणलाल शहा, अक्षय माने, ताराचंद आवळे, प्रा.डॉ.पी. एन. शिंदे, डॉ. जगन्नाथ भटकर, प्रा. विनायक राऊत, अनुराधा कोल्हापुरे, वैदेही कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनात आपला सहभाग असून आपण द्याल ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू असे आश्वासन दिले. साहित्य संमेलनाचा एकूण निधी संकलनाचे उद्दिष्ट पाहता या बैठकीमध्ये पुसेगावच्या शाखेच्या वतीने ९९ हजार व रहिमतपूर येथील व्ही. एम. भोसले यांनी ५ हजार रुपये व डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून ११ हजार रुपये निधी जाहीर करण्यात आला. निधी संकलनाच्या संदर्भात पुन्हा एकदा स्वतंत्रपणे बैठक घेऊन स्वतंत्र समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल, असे आश्वासन विनोद कुलकर्णी यांनी देऊन उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मसाप शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशनचे ॲड. चंद्रकांत बेबेले, किशोर बेडकिहाळ, सचिन सावंत, वजीर नदाफ, अजित साळुंखे, आर. डी. पाटील, अनिल जठार, सतीश घोरपडे, तुषार महामुलकर आदी उपस्थित होते.

Adv