अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखालील सातारा नगरपरिषदेच्या कारभारात काही नगरसेवक व नगरसेविकांच्या नातेवाईकांचा वाढता हस्तक्षेप प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे. विशेषतः पती, पुतणे, मुलगे तसेच पाहुणे मंडळी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामांमध्ये हस्तक्षेप? करत असल्याने अधिकारी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.
सदर हस्तक्षेपाचे पालिकेतच सी सी व्ही फुटेज उपलब्ध आहे याचाही शोध नगराध्यक्ष यांनी घ्यावा व हा हस्तक्षेप रोखावा अशी मागणी सुद्धा अधिकाऱ्यांकडून खाजगीत बोलली जात आहे
नगरपरिषदेतील विविध विभागांमध्ये कामांच्या फाईली, ठेके, विकासकामे तसेच दैनंदिन प्रशासकीय निर्णयांमध्ये लोक प्रतिनिधींच्या नातेवाईकांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाला अनेकदा काम करताना अडचणींचा सामना करावा लागत असून “नेमके आदेश कोणाचे मानायचे?” असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहत आहे.
दरम्यान, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जात असताना नगराध्यक्ष अमोल मोहिते हे अशा हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी ठोस भूमिका घेणार का, याकडे सातारा शहराचे लक्ष लागले आहे. नगरपरिषद कारभारात लोकप्रतिनिधींव्यतिरिक्त त्यांच्या नातेवाईकांचा वाढता वावर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असल्याचेही बोलले जात आहे.
साताऱ्यातील अनेक नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त होत असून, निवडून दिलेले प्रतिनिधीच जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या नातेवाईकांनी कारभारात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. काही अधिकाऱ्यांनी अनौपचारिक चर्चेत “सतत होणाऱ्या फोन कॉल्स आणि दबावामुळे कामकाजावर परिणाम होत आहे,” अशी खंत व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
यामुळे आता सर्व जबाबदारी श्री छ उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरच सोपवली जाणार का, असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न स्थानिक नेतृत्वानेच सोडवणे अपेक्षित असताना नगरपरिषदेतील वाढत्या हस्तक्षेपामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असल्याची चर्चा रंगत आहे.
आता नगराध्यक्ष अमोल मोहिते हे पुढे येत नगरपरिषदेतील अनधिकृत हस्तक्षेप थांबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देणार का, तसेच अधिकारी वर्गाला दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






