Sunday, May 24, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी समीरराजे घाटगे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी समीरराजे घाटगे

99
Adv

सातारा | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने सातारा जिल्ह्यात युवा नेतृत्वाला बळ देत समीर चंद्रकांत घाटगे यांची युवक जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. शरद पवार यांच्या विचारसरणीवर ठाम राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करणारे तसेच आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या समीर घाटगे यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी समीर घाटगे यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नियुक्तीचा क्षण उपस्थित कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद करत जल्लोष साजरा केला.

समीर घाटगे यांनी गेल्या काही वर्षांत युवकांमध्ये पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. विशेषतः शरद पवार यांच्या पुरोगामी आणि सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास ठेवून त्यांनी सातारा जिल्ह्यात युवकांना संघटित करण्याचे काम सातत्याने केले. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास व्यक्त करत युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नियुक्ती पत्रातही समीर घाटगे यांनी तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे. आगामी काळात युवक संघटना अधिक मजबूत करून पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवा संघटनाला नवी ऊर्जा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Adv