उत्पादक-लघुउदयोजक आणि सर्वसामान्य ग्राहक यांची सांगड घालुन अर्थकारणाला गती देण्याचा आदर्श पायंडा नक्षत्र महोत्सवाने पाडला, त्यामुळे आत्मनिर्भर महिला सक्षमीकरणाची नवी दिशा राज्याला मिळाली आहे असे गौरवोद्गार नक्षत्र सातारा संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ.दमयंतीराजे भोसले यांनी काढले.
नक्षत्र,सातारा संस्थेच्या जिल्हापरिषदेच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या नक्षत्र महोत्सव- 2025 चे उद्घाटन क-हाडच्या उदयोजिका श्रीमती शालीनी फल्ले, शाहुपूरी सातारा येथील सौ.चारुशिला कुलकर्णीसंगमनगर,सातारा येथील सौ.सुनिता लक्ष्मीकांत लुणावत, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमंत छत्रपती सौ.दमयंतीराजे भोसले बोलत होत्या.
यंदा नक्षत्र महोत्सवाचे हे 20 वे वर्ष आहे. सातत्यपूर्ण इतकी वर्षे नक्षत्र महोत्सव आयोजित होत आहे याचे सर्व श्रेय महोत्सवात भाग घेणा-या उदयोजक-व्यावसायिकांचे आणि नक्षत्र संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांसह सर्व सातारकरांचे आहे असे नमुद करुन, श्रीमंत छत्रपती सौ.दमयंतीराजे भोसले यांनी सांगीतले की, स्थानिकांना रोजगार, ग्राहकांच्या चोखंदळपणाला वाव, अर्थकारणाला गती देणे, इत्यादी उद्देश समोर ठेवून, नक्षत्र महोत्सवाला सुरुवात केली. या महोत्सवाचे आयोजनात सर्वांचे योगदान आहेच तथापि आपले लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज यांच्या भक्कम पाठींबा मिळत आला आहे. नक्षत्र महोत्सवात सहभाग घेतल्याने अनेक उदयोजक-उदयोजिकांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली,ही मोठी उपलब्धी आहे.प्रदर्शनाच्या उद्घाटक असलेल्या शालिनी फल्ले यांनी प्रथमपासून नक्षत्र महोत्सवात स्टॉलव्दारे सहभाग घेतला आणि शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची प्रेरणादायी किमया साध्य केली आहे.अश्या अनेक महिला भगिनींना आणि उदयोजकांना नवीन आत्मविश्वास मिळाला. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेकांना आपल्या संसाराला आकार देत जिल्हयाच्या,राज्याच्या उदयोग विकासामध्ये अमुल्य योगदान दिले आहे. नक्षत्र प्रदर्शनाव्दारे आत्मविश्वास जागृत होतो,याचे आम्हा सर्वांना आत्मिक समाधान आहे. सातारकर नागरीकांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नक्षत्र महोत्सवाला भरभरुन साथ दयावी असे आवाहनही याप्रसंगी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी केले.
प्रारंभी शाहुपूरी सातारा येथील सौ.चारुशिला कुलकर्णी, श्रीमती शालिनी फल्ले आणि सौ.सुनिता लक्ष्मीकांत लुणावत, यांच्या हस्ते नक्षत्र महोत्सव 2025 चे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिंग तुता-याचा निनाद आणि फटाक्यांच्या आतशबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणुन गेला होता. स्टॉलधारकांसह ग्राहक नागरीकांची मांदियाळी होती. प्रचंड उत्साहाचा एक माहौल या परिसरात निर्माण झाला होता. श्रीमंत छत्रपती सौ.दमयंतीराजे यांनी उद्घाटनानिमित्त मान्यवरांच्या समवेत जवळजवळ प्रत्येक स्टॉलला भेट देवून,स्टॉलधारकांच्या उत्पादन-वस्तुंबाबत आस्थावाईकपणे विचारपूस करत पहाणी केली.
तसेच एकाच वेळी 12 वेगवेगळया योगा आसनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या सातारची सुकन्या डॉ.जान्हवी जयप्रकाश इंगळे यांचा विशेष सत्कार श्रीमंत छत्रपती सौ.दमयंतीराजे भोसले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या महोत्सवात दररोज विविध स्पर्धातमक आणि करमणुकीचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दररोज संबंधीतांना विविध प्रकारची बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत.