Friday, August 14, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शाहूपुरीत दिग्गज नगरसेवक, तरी हद्दवाड भाग अंधारात; खांबावरील दिव्यांसाठी नागरिकांची प्रतीक्षा!

शाहूपुरीत दिग्गज नगरसेवक, तरी हद्दवाड भाग अंधारात; खांबावरील दिव्यांसाठी नागरिकांची प्रतीक्षा!

16
Adv

सातारा शहरात समाविष्ट झालेल्या शाहूपुरी हद्दवाढ भागातील पथदिव्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत काळात बसविण्यात आलेल्या जुन्या दिव्यांवरच आजही या भागातील नागरिकांना उजेडाची व्यवस्था करावी लागत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शाहूपुरी विभागातील हद्दवाढ भागाला सुमारे ५०० नवीन पथदिव्यांची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी जुने दिवे बंद असून, काही ठिकाणी खांब असूनही त्यावर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे.

सातारा शहरातील शाहूपुरी विभागातील हद्दवाड भागात खांबावरील दिव्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसराला तब्बल ५०० दिव्यांची गरज असतानाही अद्याप पुरेशा प्रमाणात दिवे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शाहूपुरी भागात दिग्गज नगरसेवक असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर नगरसेवक नेमके करतात काय, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे शाहूपुरीचे नगरसेवक मंत्री महोदयांच्या आसपास सक्रिय असतात, अशी चर्चा असतानाही आपल्या भागातील दिव्यांचा प्रश्न मार्गी का लागत नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, दिव्यांची खरेदी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा अडसर आहे की प्रशासनाचा नकार? याबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत असून, रस्त्यांवरील सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी ५०० दिव्यांची खरेदी करून शाहूपुरी हद्दवाड भागाचा अंधार दूर करणार का? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राजकीय वजन असलेल्या भागांना सुविधा मिळतात की सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांनाही समान प्राधान्य दिले जाते, याकडे आता शाहूपुरीकरांचे लक्ष लागले आहे.

Adv