Thursday, April 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जानेवारीत साताऱ्यात बाल एकांकिका स्पर्धा

जानेवारीत साताऱ्यात बाल एकांकिका स्पर्धा

236
Adv

साताराः अभिनयाचे अंगभूत गुण प्रदर्शित करण्यासाठी लहानपणीच व्यासपीठ मिळावे, रंगभूमीसह छोट्या-मोठ्या पडद्याला अनेक हरहुन्नरी छोटे कलावंत मिळावेत या उद्देशाने येथील कल्याणी ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. संस्थेचे संस्थापक, माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी बालदिनी ही घोषणा केली.

राज्यातील मोजक्या शहरांमध्येच बाल एकांकिका स्पर्धा घेतल्या जातात आणि गेल्या काही वर्षांपासून सातारचा समावेश अशा शहरांमध्ये झाला आहे. गेली दोन वर्षे कोविडच्या प्रकोपामुळे या स्पर्धा घेता आल्या नव्हत्या. तत्पूर्वी दोन वर्षे या स्पर्धा झाल्या. यावर्षी शाळांच्या स्नेहसंमेलनांचा कालावधी विचारात घेऊन त्यातील नाटिका स्पर्धेत उतरवता याव्यात यासाठी जानेवारीच्या अखेरीस स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राक्षे यांनी दिली.

साताऱ्यात एकांकिका स्पर्धांना नेहमीच भरघोस प्रतिसाद मिळतो. रंगकर्मींची भावी पिढीही स्पर्धेत चमकण्यासाठी उत्सुक असते. परंतु या लहानग्यांना खूपच कमी व्यासपीठे उपलब्ध होतात. आता संधींचा विस्तार झाला असून, साताऱ्याच्या आसपासच विविध चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरण होत असल्यामुळे गुणवत्ता असलेल्या कलावंतांना छोट्या-मोठ्या पडद्यावर चमकणे शक्य झाले आहे. एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या गुणवंत कलाकारांकडे या दृष्टीनेही आता अनेकांचे लक्ष असते आणि त्यांना संधीही लगेच मिळू शकते. सध्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये बाल कलावंतांचाही बोलबाला आहे. या पार्श्वभूमीवर, कल्याणी ग्रुपच्या बाल एकांकिका स्पर्धांकडे गांभीर्याने पाहिले जातात, असे राक्षे म्हणाले.

चौकट…

भव्य पारितोषिकांचे आकर्षण

कल्याणी ग्रुपच्या बाल एकांकिका स्पर्धेला सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, पुणे, नांदेड, सांगली आदी जिल्ह्यांमधून संघ येतात. १६ वर्षांखालील मुलांना स्पर्धेत भाग घेता येतो. विजेत्या संघांना मोठ्या रकमेची रोख बक्षिसे आणि मानचिन्हे दिली जातात. त्याचप्रमाणे दिग्दर्शन, पुरुष आणि स्त्री अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यासाठीही पारितोषिके दिली जातात. त्यामुळेच राज्यातील अनेक संघ स्पर्धेची वाट पाहत असतात.

Adv