सातारा: जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर परिसरातील मौजे मुनावळे (ता. जावळी) येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन (वॉटर स्पोर्ट्स) प्रकल्पास विविध विभागांच्या आवश्यक ना-हरकत परवानग्या न मिळाल्याने रखडला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी अन्य अत्यावश्यक विकासकामांसाठी वळविण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणवादी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात, राज्य शासनाने पर्यटन व्यवसायास चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सदर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पांतर्गत पर्यटन विभागाचे क्षेत्रीय कार्यालय, प्रेक्षागृह (गॅलरी), उपहारगृह, तिकीट आरक्षण कक्ष, सुरक्षा चौकी, पर्यटक निवास व्यवस्था, बोटिंग क्लब, बोट धक्का आदी बांधकामांची तरतूद करण्यात आली होती.
मात्र प्रस्तावित प्रकल्प क्षेत्र हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रात येत असल्याने तसेच केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याठिकाणी विकासकामांसाठी काही निर्बंध घातल्यामुळे हा प्रकल्प विविध परवानग्यांअभावी रखडला आहे.
या प्रकल्पाच्या विरोधात सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व कोयना धरणावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शासनाने मंजूर निविदा प्रक्रियेलाही स्थगिती दिली होती. दरम्यान, कार्यारंभ आदेशाला एक वर्षाहून अधिक कालावधी उलटला आहे. तथापि, पर्यावरण व वन विभागासह इतर संबंधित शासकीय विभागांच्या आवश्यक परवानग्या न मिळाल्याने संबंधित जलपर्यटन प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे. विविध पर्यावरण कायद्यांमधील संवेदनशील बाबींचा विचार करता, भविष्यातही या ठिकाणी पर्यटन प्रकल्प राबविणे शक्य होणार नाही. परिणामी, सार्वजनिक निधीचा कार्यक्षम व लोकहितार्थ वापर होणे अत्यावश्यक असल्याने शासनाने मंजूर केलेला निधी आवश्यक त्या इतर प्रकल्पांसाठी वळवून त्याचा सार्वजनिक हितासाठी योग्य उपयोग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच संबंधित विभागांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.






