भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शुक्रवारी (२४ जुलै) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)चे आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघातील भाडळे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर साताऱ्यात भाजपच्या जिल्हा संघटनात्मक बैठकीलाही ते उपस्थित राहणार असल्याचे दौरा कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या कोरेगाव मतदारसंघात उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत. या दौऱ्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या नंतर आमदार महेश शिंदे यांची भाजपशी वाढती जवळीक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सातत्याने होत असलेल्या भेटी आणि संयुक्त कार्यक्रमांमुळे राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर, “आमदार महेश शिंदे शिवसेना नेत्यांना जय महाराष्ट्र करणार का?” असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मात्र, याबाबत आमदार महेश शिंदे किंवा संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
उद्याच्या रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याकडे केवळ विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापेक्षा सातारा जिल्ह्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही लक्ष लागले आहे.






