७ ऑगस्टला आत्मदहन आंदोलन

14
Adv

कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत जिहे-कठापूर उपसा सिंचन, कृष्णानगर सातारा चा कार्यकारी अभियंता अमोल निकम यांनी वेगवेगळ्या ठेकेदारांना ७६३ कोटी ७७ लाख ६७ हजार ३८९ इतक्या रकमेची टेंडर देऊन विविध कंपन्यांच्या नावावर आर्थिक रक्कमेच्या रुपयांचा गफला केला असून त्यांचे निलंबन करावे या मागणीसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पुणे यांच्या दालनासमोर सोमवारी बेमुदत उपोषण सुरु केले होते परंतु हे प्रकरण मंत्रालय स्तरावर प्रलंबित असून मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा अशी चर्चा अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्याशी झाले. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले परंतु ७ ऑगस्ट पर्यंत याप्रकरणी कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत जिहे-कठापूर उपसा सिंचन, कृष्णानगर सातारा चा कार्यकारी अभियंता अमोल निकम यांनी वेगवेगळ्या ठेकेदारांना ७६३ कोटी ७७ लाख ६७ हजार ३८९ इतक्या रकमेची टेंडर देऊन विविध कंपन्यांच्या नावावर आर्थिक रक्कमेच्या रुपयांचा गफला केला आहे. या कंपन्यांमध्ये पत्नीला भागीदार करुन प्रत्यक्ष कृष्णा खोऱ्याची टेंडर देऊन ठेकेदारांकडून सरकारी पैसा लाटला आहे. या प्रकरणात सरकारी नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. ठेकेदाराच्या नावे टेंडर घेऊन पत्नीच्या कंपन्यांच्या नावावर पैसा लाटणा-या कार्यकारी अभियत्याची लाचलुचपत प्रतिबंधक कायदाखाली चौकशी तसेच बेनामी संपत्ती कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला ३१ मे पर्यंत बडतर्फ करावे आणि आयकर विभाग, ईडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी पुराव्यानिशी तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर मुख्य अभियंता (विप्र)जलसंपदा विभाग पुणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मंडळ कार्यालयाने याबाबत तपासणी केली असता तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने श्री.निकम यांना स्वयंस्पष्ट मुद्देनिहाय खुलासा सादर करण्याविषयी विभागीय कार्यालयास कळवण्यात आले होते. त्यानुसार गोपनीय पत्राव्दारे खुलासा प्राप्त झाला होता. गोपनीय अहवाल आणि कागदपत्राच्या पुराव्यानुसार प्रदेश कार्यालयास अभिप्राय सादर करण्यात आला होता. याप्रकरणी अधीक्षक अभियंता, दक्षता पथक, पुणे परिमंडळ, पाटबंधारे विभाग, पुणे कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आला होता. या प्रकरणाचा चौकशी अहवाल अपर मुख्य सचिव यांनी सादर करण्याबाबत आदेश दिले होते. यासंबंधी पुढील कार्यवाही शासन स्तरावरून सुरु आहे परंतु याबाबत नि:पक्ष चौकशी होण्यासाठी श्री. निकम यांचे निलंबन होणे आवश्यक आहे ते आजपर्यंत झाले नाही त्यामुळे श्री. निकम यांचे निलंबन करुन मग पुढील चौकशी करावी ही मुख्य मागणी आहे. त्यासाठी सोमवार दि.३० जूनपासून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक पुणे यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण श्री. मोरे यांनी केले होते. यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्याशी समक्ष चर्चा झाली. यावेळी त्यांनी श्री.निकम, त्यांची पत्नी आणि नातेवाईकाची चौकशी सुरु आहे. परंतु श्री. निकम यांचे निलंबन आणि कारवाई करण्याचे अधिकार मंत्रालय स्तरावर आहेत. त्यामुळे त्याबाबतचा प्रस्ताव विहित नमुन्यात भरुन पाठवण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा आपण मंत्रालय स्तरावर करावा असे श्री. सांगळे यांनी सांगितले. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असून दि. ७ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशाराही श्री. मोरे यांनी यावेळी दिला.

Adv