Monday, November 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City कांदाटी खोऱ्यातील खरोशीत २०० एकरचा भूखंड घोटाळा

कांदाटी खोऱ्यातील खरोशीत २०० एकरचा भूखंड घोटाळा

96
Adv

सातारा: पुण्यातील उद्योगपती गोयल कुटुंबीयांचा कांदाटी खोऱ्यातील खरोशी (ता.महाबळेश्वर) येथे भूखंड घोटाळा उघडकीस आला आहे. संबंधितांनी एकाच गावात तब्बल २०३ एकर जमीन खरेदी केली आहे. याबाबत साताऱ्यातील पर्यावरण व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी लँड बॉम्ब टाकला आहे.

त्यांनी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार दाखल केली आहे. यावेळी झालेल्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून यामध्ये गोयल कुटुंबीयांनी कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. मौजे खरोशी ता. महाबळेश्वर येथील संबंधित जमीन ही पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील परिसरात येत असून या भागातील जमीन वापर, मोठ्या प्रमाणातील जमीन धारणा, जमीन हस्तांतरण तसेच भविष्यातील संभाव्य विकासकामांचा पर्यावरणीय समतोलावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने याची महसूल व पर्यावरणीय दोन्ही अंगानी वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली पश्चिम घाटातील या परिसरात रिकाम्या जागा बळकावणारे मुळशी पॅटर्न सध्या सर्वत्र दिसताहेत. कांदाटी खोऱ्यातील काही गावांमध्ये पुण्या-मुंबईच्या राजकीय लोकांसह अधिकारी लॉबीकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी सुरु आहे. त्यातच खरोशी ता. महाबळेश्वर येथे शेकडो एकर जमिनीची नियमबाह्य खरेदी विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे.
यामध्ये आशिष शिवकुमार गोयल यांनी २४ हेक्टर, विनोद रघुवीरसिंग गोयल यांनी १३ हेक्टर, शिवकुमार रघुवीरसिंग गोयल यांनी १७ हेक्टर, अशोक रघुवीरसिंग गोयल यांनी २९ हेक्टर क्षेत्र खरेदी केले आहे. सर्व मिळून २०३ एकर पेक्षा जास्त भूखंडाचा मामला असल्याचे स्पष्ट होत आहे. खरोशी (ता. महाबळेश्वर) येथील संबंधित जमीन ही कोरडवाहू व पडीक असल्यामुळे या जमिनीची ५४ एकर एवढी जमीन धारणेची मर्यादा निश्चित असल्याचे दिसून येते. त्यामुळे गोयल कुटुंबीयांवर महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.

कोट:
नवीन महाबळेश्वरच्या नावाखाली कांदाटी खोऱ्यातील गावे गिळंकृत करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा माफियाराज जिल्ह्यात बोकाळला आहे. गोयल कुटुंबीयांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करून या प्रकरणाची पाळेमुळे प्रशासनाने खणून काढावीत. तसेच गोयल कुटुंबीयांच्या पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील जमीन खरेदीची चौकशी करावी.
~सुशांत मोरे, पर्यावरण व माहिती अधिकार कार्यकर्ते

◻️कायदा काय सांगतो?
जमिनीची प्रतवारीनुसार खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शेतमजीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार बारमाही पाणीपुरवठा किंवा बागायत जमिनीसाठी १८ एकर कमाल धारणाक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. बारमाही परंतु पाणीपुरवठा नसलेली पण वर्षातून एका पिकासाठी खात्रीचा पाणीपुरवठा असलेल्या जमिनीसाठी २७ एकर कमाल धारणा मर्यादा आहे. हंगामी बागायत किंवा भातशेतीसाठी ३६ एकर कमाल धारणा क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. कोरडवाहू जमिनीसाठी जमीन धारणेची मर्यादा ५४ एकर एवढी निश्चित करण्यात आली आहे.

◻️झाडाणी प्रकरण ताजे..
गुजरात अहमदाबाद येथील तत्कालीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी व नातेवाईकांनी महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी शेजारील झाडाणी गावामध्ये ६४० एकराची खरेदी करत संपूर्ण गावच विकत घेतले होते. हे प्रकरण देशभर गाजले होते. मात्र संबंधितांना मोठ्या प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागल्याचे प्रकरण ताजे आहे.

Adv