Friday, November 20, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District जिल्हा बँकेच्या राड्यानंतर आता जिल्हा परिषदेत कोणाची वर्णी?

जिल्हा बँकेच्या राड्यानंतर आता जिल्हा परिषदेत कोणाची वर्णी?

151
Adv

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत चेअरमनपदावरून झालेल्या राजकीय संघर्षानंतर आता जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेतील सत्तासंघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय कुरघोड्यांनंतर आता जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार, कोणाच्या समर्थकांची वर्णी लागणार आणि कोणाला राजकीय पुनर्वसनाची संधी मिळणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
जिल्हा परिषदेत नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य नियुक्तीच्या हालचालींना आता वेग आला असून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाच पक्षांच्या गटनेत्यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये शिवसेनेचे अशोक दगडू पाटील, भाजपचे राजू अनिल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय सदाशिव कुलकर्णी, काँग्रेसच्या सुनंदा नामदेव पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे राजेंद्र संजराव शेलके यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने नामनिर्देशित सदस्यांची पात्रता व नियुक्तीबाबत २०२६ चे नियम अधिसूचित केल्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
२५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेल्या सदस्यसंख्येच्या २० टक्के किंवा किमान पाच व्यक्ती, यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या आधारे नामनिर्देशित सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे. पक्षीय संख्याबळ, पात्रता आणि नियुक्तीच्या निकषांवर बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्हा बँकेतील राजकीय संघर्षानंतर जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांच्या निमित्ताने कोणते नवे राजकीय समीकरण आकाराला येते, कोणत्या पक्षाला किती संधी मिळते आणि नेत्यांच्या राजकीय ताकदीचा कोणाला फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Adv