सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन निवडीला अवघे काही तास शिल्लक असताना साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून, पालकमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे.
उद्या सकाळी जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाची निवड होणार असल्याने या बैठकीत नेमका कोणता फॉर्म्युला ठरतो आणि चेअरमनपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हाती जाणार, हा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. चेअरमनपद भाजपकडे जाणार, राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार की शिवसेनेला संधी मिळणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी कोणती भूमिका घेतात आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्याच्या निवडीत केवळ चेअरमनच नव्हे, तर महायुतीतील राजकीय ताकद आणि नेत्यांचे वजनही स्पष्ट होणार आहे.






