सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसंदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या बैठकांच्या राजकारणात खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. महायुतीच्या माध्यमातून जिल्हा बँकेतील सत्तावाटपाची चर्चा सुरू असताना उदयनराजेंना चर्चेपासून दूर ठेवल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याचे पुण्यातील भेटीतून स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या राजकीय घडामोडींसह साताऱ्यातील विकासकामांवर चर्चा केली. आपल्या राजकीय भूमिकेचा आणि कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यावर फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, जिल्हा बँकेच्या चेअरमन-व्हाईस चेअरमन निवडीच्या प्रक्रियेत महायुतीतील सर्व घटकांना सोबत घेण्याची चर्चा होत असताना उदयनराजेंना निमंत्रण नसणे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेची दखल घेणे, या घडामोडी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
आता जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात उदयनराजेंच्या भूमिकेला किती महत्त्व मिळणार आणि त्यांच्या समर्थकांना कोणती संधी मिळणार, याकडे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






