सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने बाजी मारल्यानंतर अवघ्या २४ तासांतच जिल्हा परिषदेच्या राजकारणात नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी आणि विधानपरिषद आमदार धैर्यशील कदम यांनी सातारा जिल्हा परिषदेत तब्बल दोन तास ठाण मांडत विविध विभागांतील कामांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांपासून सर्व सभापती आणि विविध विभागांच्या प्रमुखांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी गाठीभेटी घेतल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक विभागात जाऊन कामकाजाची माहिती घेण्यामागील राजकीय अर्थ काय, याची चर्चा आता जिल्हा परिषद वर्तुळात रंगू लागली आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर धैर्यशील कदम यांचा जिल्हा परिषदेत वाढलेला सक्रिय वावर अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. आगामी जिल्हा परिषद राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे पाहिले जात असून, कदम यांच्या भेटीगाठी केवळ प्रशासकीय होत्या की त्यामागे काही राजकीय गणिते आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांच्याशी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर झालेली चर्चा आणि एकमेकांमधील कानगोष्टींनी या राजकीय चर्चेला आणखी हवा दिली.






