कराड तालुक्यातील अतिवृष्टी बाधित गावातील पिकांची  विभागीय आयुक्तांनी  केली  पाहणी

78
Adv

अतिवृष्टीमुळे पुणे विभागात सुमारे दीड लाख हेक्टरवरील आधिक पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे बाबत प्रत्येक जिल्ह्यात लवकरच हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या हेल्पलाईन वर संपर्क साधावा असे पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर  यांनी आज येथे सांगितले.
                 विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज कराड तालुक्यातील नांदलापूर, नारायणवाडी आणि मलकापूर  येथील शेतात जाऊन पिकांची  पाहणी केली. त्यानंतर  त्यांनी माहिती दिली.
            यावेळी उपायुक्त  प्रताप जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमर वाकडे, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष धोत्रे  आदी उपस्थित होते.
            डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नुकसानीचा अंदाज घेतला असता सुमारे दीड लाख हेक्टर खालील पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
            अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना संयुक्तपणे पंचनामे करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर पंचनामे केले जातील, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Adv