Sunday, October 4, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार

78
Adv

सातारा : मेढा-महाबळेश्वर या महत्त्वाच्या घाटमार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, मागणीवर ठोस कार्यवाही होत नसल्याने मोरे यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यानंतर प्रशासनाने संबंधित रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याचे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे मोरे यांच्या उपोषणाचे हे मोठे यश मानले जात आहे.

मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा कडा ते महाबळेश्वर या भागाची अनेक वर्षांपासून अपेक्षित पद्धतीने दुरुस्ती व सुधारणा झालेली नाही. पावसाळ्यात या मार्गावर वारंवार दरडी कोसळणे, रस्त्यावर माती व दगड साचणे, वाहतुकीला अडथळे निर्माण होणे तसेच अपघातांचा धोका वाढणे, अशा समस्या निर्माण होतात. दरवर्षी तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने समस्या कायम राहिली आहे.

दरम्यान मेढा-महाबळेश्वर हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्यटन तसेच दळणवळणाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी रुंदीकरण आणि दरडींच्या समस्येवर शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी मोरे यांनी केली होती. तसेच वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

श्री. मोरे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर संबंधित रस्त्याचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, सुधारित आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेढा-महाबळेश्वर रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.सुशांत मोरे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

याकामी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम पूर्ण करणेचे आदेश द्यावेत अशी मागणी मोरे यांनी केली आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, अधीक्षक अभियंता श्री.सातपुते साहेब,
कार्यकारी अभियंता श्री राहुल अहिरे, सहा. कार्यकारी अभियंता निलेश कोहळे यांचे मोरे यांनी आभार मानले आहेत.

Adv