Saturday, October 3, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City जिल्हा बँकेसाठी भाजपचा ‘बी प्लॅन’ तयार?

जिल्हा बँकेसाठी भाजपचा ‘बी प्लॅन’ तयार?

133
Adv

सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही राजकीय समीकरणांना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपावर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसताना भाजपकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपच्या चिन्हावर जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वीच केली होती. समाधानकारक जागावाटप झाले नाही तर भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याचा पर्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू असली तरी 30 सप्टेंबरपर्यंत निर्णायक तोडगा निघालेला नसल्याचे वृत्त आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने मकरंद पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचेही समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘बी प्लॅन’ नेमका किती पुढे गेला आहे? आणि भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे केले तर राष्ट्रवादीच्या पारंपरिक राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार? याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. मात्र, भाजप स्वबळावरच लढणार असा अंतिम निर्णय झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून, जागावाटपाचा तिढा सुटतो की स्वतंत्र पॅनेलचा पर्याय प्रत्यक्षात येतो, याकडे सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Adv