सातारा : जिल्हा बँकेतील काही कर्मचाऱ्यांकडून सावकारी केली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी सातारा शहर पोलीस स्टेशन मध्ये झाल्याची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली आहे. या तक्रारींची अधिकृत नोंद, त्यावरील चौकशी आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतलेले खुलासे याबाबत स्पष्टता होणे गरजेचे आहे. मात्र या तक्रारींसंदर्भातील माहिती जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांकडे असल्याची चर्चा बँक वर्तुळात सुरू आहे.?
निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना या तक्रारी पुन्हा चर्चेत येणार का, याकडे लक्ष लागले आहे. संबंधित तक्रारींमध्ये नेमके काय नमूद करण्यात आले होते, त्यावर बँक प्रशासनाने काय भूमिका घेतली आणि चौकशी झाली असल्यास त्याचा निष्कर्ष काय होता, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
‘योग्य वेळी सर्व माहिती समोर येईल’, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी तक्रारींची सत्यता अधिकृत कागदपत्रे आणि चौकशीच्या निष्कर्षातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तक्रारींची फाईल पुन्हा उघडते का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीत कोणाचे ‘पत्ते’ उघडणार?
खाजगीत व्याजवाडी अथवा सावका:रीसदृश व्यवहारांबाबत काही तक्रारी असल्याची चर्चा सध्या बँक वर्तुळात आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आहे का? संबंधित कर्मचाऱ्यांचा अशा कोणत्याही व्यवहाराशी संबंध आहे का? याची अधिकृत चौकशी झाली आहे का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा पुढे आल्यास बँकेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर बँकेतील अंतर्गत घडामोडींवरही राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे. विशेषतः तिसऱ्या मजल्यावरील प्रॉपर्टी विभागातील काही कर्मचाऱ्यांकडे भाजपमधील काही नेत्यांचे लक्ष असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत कोणत्या तक्रारी आहेत आणि त्यावर भविष्यात काय भूमिका घेतली जाणार, याबाबत बँक वर्तुळात कुजबुज सुरू आहे.
सातारानामाचा थेट सवाल — तक्रारी असतील तर चौकशी करा; तक्रारी चुकीच्या असतील तर त्या स्पष्टपणे फेटाळा. जिल्हा बँकेची निवडणूक राजकीयदृष्ट्या तापत असताना कर्मचाऱ्यांशी संबंधित तक्रारींचा वापर केवळ राजकीय चर्चेसाठी न होता त्यांची वस्तुनिष्ठ छाननी होणार का, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.






