ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान असताना मारवाडी चौकातील नो-पार्किंग परिसरात आमदाराचा लोगो असलेली चारचाकी उभी असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाचे नियम नेमके सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नो-पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास सर्वसामान्यांच्या वाहनांवर तत्काळ कारवाई अथवा टोईंग केली जाते; मग आमदाराचा लोगो असलेल्या वाहनासाठी वेगळा नियम आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कर्मचारी वेळेवर आणि प्रभावीपणे दिसत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. आमदाराचा लोगो असलेले वाहन अधिकृत आहे की केवळ लोगो लावला आहे, याचीही तपासणी वाहतूक विभागाने करावी, अशी मागणी होत आहे.
नियम सर्वांसाठी समान असतील तर या वाहनावर कारवाई होणार का, याकडे आता सातारकरांचे लक्ष लागले आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चर्चेत आला असून, कायदा आणि वाहतुकीचे नियम व्यक्ती पाहून बदलतात का? हा सवाल मात्र अनुत्तरित आहे.






