राजस्थानातील अलवर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांकडून प्रचाराला वेग देण्यात आला आहे. या निवडणूक प्रचारात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचे राजकीय कनेक्शनही चर्चेत आले आहे. सातारा-सांगली विधानपरिषदेचे आमदार धैर्यशील कदम तसेच भाजप युवा नेते चिन्मय कुलकर्णी हे अलवर येथे निवडणूक प्रचाराच्या कामात सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणूक प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि पक्षाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असताना या प्रचारादरम्यान साताऱ्याशी जोडलेला एक खास प्रसंग घडला.
चिन्मय कुलकर्णी हे अलवर येथे निवडणूक प्रचारात कार्यरत असतानाच साताऱ्याचे लोकप्रिय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी त्यांच्याशी आवर्जून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अलवरमधील निवडणूक प्रचाराची माहिती घेतली तसेच परिस्थितीची विचारपूस केली.
राजकीय धावपळीत असतानाही आपल्या कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि आपुलकीचा संवाद या व्हिडिओ कॉलमधून दिसून आला. “काही अडचण आली किंवा कोणतीही मदत लागली तर नक्की संपर्क साधा,” असा आपुलकीचा शब्द उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.
या संवादामुळे अलवरच्या प्रचारात कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निवडणूक प्रचारासाठी राज्याबाहेर गेलेले असतानाही साताऱ्यातील नेतृत्वाकडून मिळणारे पाठबळ आणि संपर्काची भावना कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
अलवरमध्ये साताऱ्याची राजकीय उपस्थिती
अलवर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार धैर्यशील कदम आणि भाजप युवा नेते चिन्मय कुलकर्णी यांचा प्रचारातील सहभाग विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रातील राजकीय अनुभवाचा उपयोग करत स्थानिक निवडणुकीतील प्रचारयंत्रणेला हातभार लावण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.
दरम्यान, चिन्मय कुलकर्णी यांनी या संवादानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. दूर राजस्थानातील अलवरमध्ये असतानाही आपल्या माणसांची विचारपूस करून अडचणीच्या वेळी संपर्क साधण्याचा शब्द देणारे नेतृत्व कार्यकर्त्यांसाठी आत्मविश्वास देणारे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दूर अलवरमध्ये असतानाही आपल्या माणसांची काळजी घेणारे नेतृत्व, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारी आपुलकी आणि महाराष्ट्राबाहेरही साताऱ्याचा राजकीय ठसा—अलवरच्या निवडणूक प्रचारातून हे चित्र ठळकपणे समोर आले आहे. 🚩






