Wednesday, August 19, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District अंतिम मतदार यादीकडे लक्ष; जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

अंतिम मतदार यादीकडे लक्ष; जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम सुरू

66
Adv

सातारा, दि. १८ प्रतिनिधी

जिल्ह्याच्या सहकाराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे संभाव्य उमेदवारांसह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय गटांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १८ ते २७ ऑगस्ट या कालावधीत कार्यालयीन वेळेत हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पात्र मतदार संस्था, प्रतिनिधित्व आणि मतदारांच्या नावांवरून सहकार क्षेत्रातील पडद्यामागील राजकीय गणिते तपासली जाण्याची शक्यता आहे.
प्राप्त हरकती व आक्षेपांची छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी ७ सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ११ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणुकीच्या प्रत्यक्ष राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाही. जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, विकास सेवा सोसायट्या, साखर कारखाने, दूध संस्था आणि अन्य सहकारी संस्थांशी जोडलेले राजकीय हितसंबंध या निवडणुकीत प्रभावी ठरतात. त्यामुळे अंतिम मतदार यादीत कोणत्या संस्था आणि प्रतिनिधींना स्थान मिळते, यावर पुढील निवडणूक समीकरणांची दिशा काही प्रमाणात स्पष्ट होणार आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांच्या कार्यालयात तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह सर्व शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या विविध राजकीय गटांकडून आतापासूनच संभाव्य उमेदवारांची चाचपणी, मतदारसंस्थांची जुळवाजुळव आणि निवडणूक समीकरणांचा अंदाज घेण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरची अंतिम मतदार यादी ही जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय डावपेचांची दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

हा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर डॉ. महेश कदम यांनी जाहीर केला आहे.

Adv