Monday, August 10, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City लिंब गावातून पालिकेचा कारभार अन् शाहूपुरीकडे दुर्लक्ष?

लिंब गावातून पालिकेचा कारभार अन् शाहूपुरीकडे दुर्लक्ष?

225
Adv

सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरातील रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे अखेर नगरपालिकेच्या बुलडोझर कारवाईत भुईसपाट झाली. अदालतवाडा ते समर्थ मंदिर चौक या मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याची धडाकेबाज मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

समर्थ मंदिर परिसरातील कारवाईचे सातारकरांकडून स्वागत होत असतानाच आता शाहूपुरी चौकाचे काय? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. श्रीरंग काटेकर यांनी शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत, समर्थ मंदिरप्रमाणेच येथेही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कास, सज्जनगड, परळी तसेच ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी समर्थ मंदिर चौक महत्त्वाचा मार्ग आहे. मागील काही वर्षांत या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला होता. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. नगरपालिका प्रशासनाने अखेर या प्रश्नावर कठोर भूमिका घेत अतिक्रमणे हटविल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाने मनावर घेतले तर अशक्य ते शक्य होऊ शकते, हे समर्थ मंदिर परिसरातील कारवाईने दाखवून दिले आहे. त्यामुळे शहरातील इतर संवेदनशील भागांमध्येही अशीच धडक कारवाई होणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
विशेषतः शाहूपुरी चौक सध्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येमुळे चर्चेत आहे. चौकाच्या परिसरात व्यावसायिकांनी उभारलेली दुकाने आणि रस्त्यालगतची अतिक्रमणे यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहनांची वाढती संख्या आणि परिसरातील वाढती नागरी वस्ती पाहता हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
शहरातून आयटीआय, मोळाचा ओढा, कोंडवे तसेच आंबेदरे, दिव्यनगरी, माळवाडी आदी भागांकडे जाण्यासाठी शाहूपुरी चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या चौकात वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब बनत आहे. अशा परिस्थितीत अतिक्रमणांवर वेळीच कारवाई न झाल्यास भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

समर्थ मंदिर परिसरात कारवाई होऊ शकते, तर शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांवर कारवाई करताना नेमका अडथळा कोणता? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

अतिक्रमणधारकांकडून ‘लक्ष्मी दर्शन’ होते म्हणून काही ठिकाणी कारवाईला विलंब होतो का? असा त्यांचा संशय आहे. या आरोपांची प्रशासनाने स्पष्टता करणे गरजेचे आहे.
शहर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम खरोखरच सर्वांसाठी समान असेल, तर समर्थ मंदिरपासून सुरू झालेला बुलडोझर शाहूपुरी चौकापर्यंत कधी पोहोचणार? हाच आता सातारकरांचा सवाल आहे.

चौकट | शाहूपुरी चौकाला ‘बुलडोझर’ची प्रतीक्षा!
शाहूपुरी चौक हा वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचा संभाव्य केंद्रबिंदू बनत असल्याची नागरिकांची भावना आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि रस्त्यालगतची अतिक्रमणे यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. आयटीआय, मोळाचा ओढा, कोंडवे, आंबेदरे, दिव्यनगरी आणि माळवाडी या भागांशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे तातडीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी जोर धरत आहे.

Adv