सातारा : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व पत्रकार विजय चोरमारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाला खासदार नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चप्पल काढून प्रतिमेसमोर आदर व्यक्त केला.
मात्र, याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे यांनी प्रतिमेला अभिवादन करताना चप्पल न काढल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, दिवंगत नेत्याच्या प्रतिमेसमोर शिष्टाचार व आदर राखला गेला नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पक्षाच्या विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेत स्व. अजितदादा पवार यांच्या विचारांचा, लोकहिताच्या कार्याचा आणि जनसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
मात्र, प्रेरणादायी व्याख्यानापेक्षा प्रतिमेला अभिवादन करताना पाळण्यात आलेल्या शिष्टाचाराचीच अधिक चर्चा कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात रंगली.






