सातारा शहरातील मुख्य व्यापारी पेठ दिवसेंदिवस अतिक्रमणांच्या विळख्यात अडकत चालली असून नागरिक, वाहनचालक व पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले फेरीवाले, हातगाडे, दुकानांबाहेरील साहित्य व अनधिकृत पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
सातारा शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेचा धडाका सुरू असताना व्यापारी पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खणआळी परिसरातील अतिक्रमणांकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. गोरगरिबांच्या घरांवर आणि हातगाडेधारकांवर तातडीने कारवाई करणारे प्रशासन व्यापारी पेठेतील अतिक्रमणांबाबत मात्र मौन का बाळगून आहे, असा प्रश्न सातारकर उपस्थित करत आहेत.
खणआळी परिसरातील अनेक रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे अतिक्रमणे असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड होत असून वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढत आहे. मात्र या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचा हातोडा अद्याप पोहोचलेला नाही.
शहरात दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की, काही प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि माजी नगराध्यक्षांच्या दबावामुळे व्यापारी पेठेतील अतिक्रमणांना अभय मिळत आहे. जर ही चर्चा चुकीची असेल तर प्रशासनाने सर्वांसाठी समान नियम लागू करून व्यापारी पेठेतील अतिक्रमणांवरही कारवाई करून दाखवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“कायदा सर्वांसाठी समान आहे” असे सांगणाऱ्या प्रशासनाने गोरगरिबांवर बुलडोझर चालवताना दाखवलेली तत्परता व्यापारी पेठेत का दिसत नाही? खणआळीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे धाडस पालिका दाखवणार का, की प्रभावशाली लोकांच्या दबावाखालीच कामकाज चालणार? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत.
आता सातारकरांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे — व्यापारी पेठेतील अतिक्रमणांवर सातारा पालिकेचा हातोडा नेमका कधी पडणार? प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.






